डोंबिवली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीण मंडळ-१ माध्यमातून शुक्रवारी डोंबिवलीत भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या पदयात्रेला नागरिक, विद्यार्थी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भाजपा कल्याण ग्रामीण मंडळ-१ कार्यालय, स्वामी विवेकानंद चौक, आयरे रोड येथून पदयात्रेला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी देशभक्तीपर घोषणा देत दत्तनगर येथील १५० फूट तिरंगा चौकाच्या दिशेने मार्गक्रमण केले. ‘तिरंगा हातात घेऊया, देशभक्तीचा अभिमान जागवूया’ आणि ‘हर घर तिरंगा—घराघरात तिरंगा’ या संदेशाने परिसर दुमदुमून गेला.

मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक ॲड. मंदार गोविंद टावरे यांनी सांगितले की, हर घर तिरंगा अभियान आता केवळ एका पक्षाचा कार्यक्रम राहिलेला नसून नागरिकांचा उत्सव बनला आहे. नागरिक स्वतःहून घरांवर आणि कार्यालयांवर तिरंगा लावत असून देशभक्तीची भावना अधिक दृढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात या अभियानाला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी नमूद केले.
नगरसेवक माहेश पाटील यांनी तिरंगा यात्रेचा उद्देश प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे हा असल्याचे सांगितले. युवा पिढीने देशाच्या उभारणीत सकारात्मक योगदान द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तिरंग्याचा सन्मान आणि राष्ट्रप्रेम ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रविसिंग ठाकूर यांनी कल्याण जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये तिरंगा अभियान राबविले जात असल्याची माहिती दिली. या अभियानात भाजपा पदाधिकारी, सामाजिक संस्था, शाळा आणि नागरिक सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर युवा मोर्चाच्या माध्यमातून विविध ठिकाणी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तर नगरसेविका मंदाताई पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. हातात तिरंगा आणि मनात राष्ट्रभक्ती घेऊन नागरिक सहभागी होत असल्याने वातावरणात उत्साह निर्माण झाला आहे. सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र’चा नारा दिला. यावेळी कल्याण ग्रामीण मंडळ १ विभागातील नगरसेविका – नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने तिरंगा पदयात्रेत सहभागी झाले होते.

