( ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती ही यावर्षीची थीम )
डोंबिवली : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुर्वेकडील बाजीप्रभू चौकात गोविंदांच्या उत्साहाने आणि जल्लोषाने प्रसार न्हाऊन निघाला. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष तथा स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण दरवर्षी या दहीहंडीचे आयोजन करतात. या उत्सवातून हिंदू संस्कृती आणि परंपरांचा गौरव जपत नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येतो. दहीहंडीच्या माध्यमातून निर्माण होणारी एकजूट, आपलेपणा आणि राष्ट्रभक्तीची भावना हीच या उत्सवाची खरी ताकद आहे असेही चव्हाण आवर्जून सांगतात.

दहीहंडी सणाचे औचित्य साधून बाजीप्रभू चौक येथे सकाळी हंडीची विधिवत पूजा करून हंडी बांधण्यात आली. गोविंदांच्या थरांप्रमाणेच या उत्सवाभोवती जोडली गेलेली माणसांची नातीही घट्ट होत असल्याने हा उत्सव आता डोंबिवलीची सांस्कृतिक ओळख झाली आहे. डोंबिवलीचा मानबिंदू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. दरवर्षी अनुभवायला मिळणारी गोविंदांची एकजूट, उत्साह आणि आनंद यावर्षीही तसाच होता.
यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती ही विशेष थीम होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या राष्ट्रनिर्माणाच्या वाटचालीला अधोरेखित करणारी ही संकल्पना असून विकसित भारताचे ध्येय केंद्रस्थानी ठेवून सुरू असलेल्या भारताच्या परिवर्तनाचा प्रवास या माध्यमातून मांडण्यात आला. आत्मविश्वासाने पुढे जाणाऱ्या नव्या भारताच्या वाटचालीला सलाम करण्याचा संदेश या थीममधून देण्यात आला.

यावेळी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपा डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, डोंबिवली पश्चिम मंडल महिला मोर्चा अध्यक्षा प्रिया जोशी, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष पवन पाटील, डोंबिवली ग्रामीण मंडल महिला अध्यक्षा मनिषा राणे यांच्यासह भाजपा नगरसेवक, पदाधिकारी तसेच मान्यवर नागरिक आणि मोठ्या संख्येने दहिहंडी स्थळी उपस्थित होते. मुंबई, ठाणे, दिवा, कल्याण, अंबरनाथ येथील गोविंद पथके या हंडीला सलामी देण्यासाठी गर्दी करून होते. थरावर थर रचून दहीहंडीला सलामी दिली जात होती. गोविंदाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. सर्वात शेवटी व त्याच्याबरोबर असणाऱ्या गोविंदना खास सेल्फी बेल्ट आवश्यक होते. सेल्फी बेल्ट लावणाऱ्या पथकानाच हंडीला सलामी देता येईल असे सांगितले जात होते. हंडीचा थरार पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती.
