डोंबिवली, दि. २८ ( प्रतिनिधी ) : सासूने जावयाची गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उघड झाली. पश्चिम विभागातील फुले रोड झोपडपट्टीत ही घटना घडली. याविषयी विष्णूनगर पोलीस ठाण्यात सासूवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी सासूला अटक केली.
अटक करण्यात आलेल्या सासूचे नाव अनिताबाई चंदू वळंदे असे आहे. दोन वर्षांपूर्वी अनिताबाईच्या मुलीशी रवी रमेश सोलंकी याचे लग्न झाले होते. रवी हा पश्चिममधील गोपी टॉकिजजवळ फुले विकण्याचे काम करत होता. रवीची पत्नी मुंब्रा येथे माहेरी राहत होती. रवी आणि त्याची सासू अनिताबाई या दोघांमध्ये नेहमी भांडण होत असे. रवी नेहमी त्याच्या पत्नीला माहेरहून आपल्या घरी येण्यास विनंती करीत असे. गुरुवारी रवी हा सासुरवाडीला गेला. येथून तो आपल्या जुळ्या मुलांना घेऊन डोंबिवलीतील आपल्या घरी आला. मात्र त्याची पत्नी त्याच्याबरोबर आली नाही. सासू अनिताबाई आणि त्याची पत्नी रात्री रवीच्या घरी आले. काही वेळ वाद झाल्यावर सासू अनिताबाई हिने जावई रवी यास मारहाण करण्यास सुरुवात केली. सासूने आपल्या नातवांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता रवीने त्यास विरोध केला. सासू अनिताबाई हिने रवीचे केस पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रवीचा गळा आवळून ठार मारले. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात रवीची आई मनुबाई सोलंकी यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी सासू अनिताबाई हिला अटक केली आहे.