डोंबिवली, दि. २९ (प्रतिनिधी) : ‘कबड्डी’ खेळाचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण जीवन खर्ची करणारे व्यक्तीमत्व रमेश देवाडीकर यांचे आज पहाटे हृदयविकाराने निधन झाले. डोंबिवलीतील छत्रपती शिवाजी क्रिडा मंडळ कबड्डी संघाचे ते संस्थापक होते. मृत्य समयी ते ६५ वर्षांचे होते.
डोंबिवलीत सर्वदूर कबड्डीची पाळेमुळे रुजवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते. गेली तीन दशकांपासून ते कबड्डीचा प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत होते. त्यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना, ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेत अनेक पदांवर कार्यरत राहून कबड्डी खेळाला सुगीचे दिवस आणले. डोंबिवली शहरातून त्यानी राष्ट्रीय स्तरावरील, राज्य पातळीवरील आणि जिल्हा पातळीवरील शेकडो खेळाडू तयार करण्याचे मोठे उद्दिष्ट साध्य केले. डोंबिवलीत दोन्ही वेळा आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पार पडल्या होत्या. एक कुशल प्रशिक्षक आणि विनम्र व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती.
त्यांच्या निधनाने कबड्डी क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तीमत्व पडद्या आड गेल्यामुळे सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया :
अशोक महाजन (प्राचार्य : प्रगती महाविद्यालय, कला क्रीडा अध्यापक सेवा संघ अध्यक्ष, महापालिका प्राचार्य संघ अध्यक्ष) :
अतिशय साधा सरळ माणूस, कामाला वाहून घेतलेला. राष्ट्र, भारतीय, जिल्हा कबड्डी नव्हे तर आंतरराष्ट्रीय कबड्डीचा त्यांना रस होता. आंतर राष्ट्रीय कबड्डी समिती पदावरही ते होते. आमच्या महाविद्यालयात ज्या ज्या वेळेला कबड्डी स्पर्था आयोजित केल्या त्या प्रत्येक वेळेला त्यांनी मदत कलेली आहे. यावर्षी सुद्धा आमच्या माजी विद्यार्थी संघटना आणि विद्यालय कबड्डी स्पर्धा भरविणार आहोत त्यासाठीही ते मदत करणार होते. ते अविवाहित होते म्हणून त्यांनी संपूर्ण लक्ष कबड्डीवर केंद्रित केलं होते. ईश्वराने त्यांच्या आत्म्यास पूर्ण शांती द्यावी.
गुलाबराव पाटील (क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटकर विद्यालय) :
महाराष्ट्रा मध्ये अनेक छत्रपती घडविणारे छत्रपती आज काळाच्या पडद्याआड झाले. अविवाहित राहून त्यांनी कबड्डीची सेवा केली. मैदानावरचा खरा कार्यकर्ता अगदी चुना मारण्यापासून काम करणारा आज सुधा दोरीला हात लावारणा माणूस आता आपल्या कबड्डी मैदानावर पहायला मिळणार नाही हे मोठे दु:ख आहे.
निलेश सावंत (कब्बडी पटटु) :
देशातील सर्व कब्बडी खेळांडूसाठी झटणारे आणि खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणारे कबड्डी क्षेत्रातील द्रोणाचार्य म्हणजे रमेशसर होत. आमच्या सर्व कबड्डी खेळाडूंचे ते श्वास होते. कबड्डी हेच जीवन म्हणून जोपासलं.