डोंबिवली : शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोस्तवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून डोंबिवली परिसरातील शाळांसाठी आंतरशालेय लंगडी स्पर्धा आयोजित केली होती. १८-१९ नोव्हेंबर, १७ रोजी झालेल्या स्पर्धेत २५ शाळांमधील १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मुलीच्या दोन गटांत झालेल्या स्पर्धामधील यशस्वी संघांना आकर्षक स्मृतीचिन्हे तसेच रोख बक्षिसे देणेत आली.
मुलींच्या लहान गटामध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर प्राथमिक, चंद्रकांत पाटकर विद्यालय आणि कल्याण डोंबिवली महापालिका शाळा क्र. २० असे चार क्रमांक आले. तसेच मोठ्या गटामध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक, गावदेवी विद्यालय ज्ञानेश्वरी विद्यालय, आणि स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरुणोदय माध्यमिक असे चार क्रमांक आले.
मुलांच्या लहान गटामध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रामचंद्रनगर असे इंग्रजी माध्यम, चंद्रकांत पाटकर विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक आणि दत्तनगर प्राथमिक असे चार क्रमांक आले. तसेच मुलांच्या मोठ्या गटात चंद्रकांत पाटकर विद्यालय,आदर्श विद्यालय निळजे, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक, भारतमाता विद्यालय असे चार क्रमांक आले. त्याचप्रमाणे असामान्य वैयिक्तक कामगिरी केलेल्या खेळाडूंना पदके आणि रोख बक्षिसे देण्यात आली. प्रमुख पाहुणे क्रीडा पत्रकार अविनाश ओंबासे आणि संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आले.
सुवर्ण महोत्सवी वर्षांत १ मे २०१७ रोजी झालेला देखणा उदघाटन समारंभ, गणिताची कार्यशाळा, वक्तृत्व विकासाची कार्यशाळा, आंतरशालेय चित्रकला स्पर्धा, शिक्षकांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा अशा भरगच्च कार्यक्रमांची मांडणी करण्यात आली आहे.
संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणाबद्दल आस्था असलेल्या मोजक्या मंडळींनी अतिशय कष्टाने, मेहनतीने आणि असंख्य शिक्षणप्रेमीच्या सहकार्याने संस्था उभी केली. त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. सात प्राथमिक, सहा माध्यमिक, एक इंग्रजी माध्यम शाळा आणि रात्र महाविदयालय तसेच कसारा जवळील दुर्गम भागात असलेली आदिवासी आश्रमशाळा एवढा मोठा पसारा म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संस्था. या संस्थेने या सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण केलेले आहे.