डोंबिवली : आपल्या समाजात अनेक रोल मॉडेल आहेत, फक्त डोळसपणे आपण त्यांना ओळखले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ मार्गदर्शक माधव जोशी यांनी केले. पुर्वेकडील ओंकार एज्युकेशन ट्रस्टतर्फे आयोजित ज्ञानोत्सव व्याख्यानमालेत जोशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या प्रमुख दर्शना सामंत, अर्चना परुळेकर, अपर्णा वाघ, अनुजा नाईक आदी मान्यवर उपस्थित हेते.
विद्यार्थ्यांशी संवाद करतांना व्यक्तीमत्व कसे चांगले होईल यासाठी विद्यार्थ्यांना त्यांनी गरुडाची गोष्ट सांगितली. गरुड ढगांच्यावर भरारी घेतो. आपल्या आयुष्याला नवी चेतना देण्यासाठी गरुडाला अनेक शारीरिक वेदना सहन करव्या लागतात. या वेदना सहन करत गरुड आपल्या जीवनाला नव्याने आकार देतो. गरुडाची ही जीवनशैली विद्यार्थ्यांनी स्विकारावी असे यांनी सांगितले.
ते विद्यार्थ्यांना पुढे म्हणाले, आपल्या जीवनात कुटुंबाचा मोठा सहभाग असतो, त्यांच्या मताचा आदर करा, सकारात्मक विचारसरणीला महत्त्व द्या. सकाळी उठल्यावर चांगल्या विचारांचे नमन करा. हे विचार दिवसभर टॉनिकचे काम करतील. दुस-याचा आदर करा, बोलणे सौम्य ठेवा, विचार करुन बोला, वाद घालू नका, दुस-याचे कौतुक करा यासर्वातून तुमच्यातील नेत्वृत्वाचे गुण समोर येतील. माधव जोशी यांचे स्वागत ओंकार ट्रस्टच्या प्रमुख दर्शना सामंत यांनी केले. यावेळी विद्याथी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.