डोंबिवली : गरीब, गरजूंसाठी अत्यवश्यक असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील सूतिकागृहाच्या उभारणीबाबत वेळकाढू धोरणामुळे भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. नुतनीकरण होणाऱ्या इमारतीचे सावित्रीबाई फुले नामकरण व्हावे अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. परंतु पोलिलासांच्या परवानगीशिवाय केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळानी सोडून दिले.
भारिप बहुजन महासंघाचे डोंबिवली शहर अध्यक्ष राहून नवसागरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्वेकडील इंदिरा चौकात सूतिकागृहाच्या उभारणीबाबत वेळकाढू धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी डोंबिवली शहर महासचिव मिलिंद साळवे, उपाध्यक्ष सुरेंद्र ठोके, सिद्धार्थ कनकुटे, राजू तुपे, मुरलीधर कांबळे, नंदू पाईकराव, परमेश्वर वाघ, संतोष खंदारे, निना मोरे, रेखा कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नवसागरे म्हणाले, चार वर्षांपूर्वी सूतिकागृहाच्या इमारतीच्या छताचा काही भाग तुटून पडल्यानंतर ही इमारत धोकादायक घोषित करून पालिका प्रशासनाने ती पाडली. त्यानंतर या इमारतीमधील प्रसूतीविभाग शास्त्रीनगर रुग्णालयात हलविण्यात आला. पालिकेच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना तपासणीअंती कधी डॉक्टर नसल्यामुळे तर अनेकदा अत्यावश्यक सुविधा नसल्याचे कारण देत मुंबई किंवा कळवा येथे नेण्याचा सल्ला दिला जातो.
खासगी रुग्णालयातील प्रसूतीचा खर्च परवडत नसलेल्या पालिकेच्या सूतिकागृहात डोंबिवली, ग्रामीण भाग, दिवा येथून महिला मोठ्या संख्येने येतात. यामुळे प्रसूतिगृहाची इमारत तातडीने उभारावी आणि त्या इमारतीस सावित्रीबाई फुले नांव द्यावे अशी मागणी भारिप बहुजन महासंघ करीत आहे.