डोंबिवली : पत्रकारिता क्षेत्रात गेली दोन दशके कार्यरत असणारे डोंबिवलीतील जेष्ठ पत्रकार अजय निक्ते यांनी चित्रपट सृष्टीत दरमजल करीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. मराठी, हिंदी चित्रपट तसेच मालिकांमधून त्यांनी विविध व्यक्तीरेखा सादर केल्या आहेत. त्यांच्या तडफदार अभिनयाची दखल घेत ‘अनफिट’ या लघुपटात निक्ते यांना महत्वपूर्ण भूमिका मिळाली आहे. विशेष म्हणजे किन्नर समाजाच्या आयुष्यावर हा लघुपट असून ‘अनफिट’ लघुपटास नुकतेच दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
अमेरिकन इंडियन इंटरनॅशनल फ्लिम अवॉर्ड या महोत्सवात ‘अनफिट’ लघुपटास बेस्ट शॉर्ट फ्लिम युवर्स चॉईस पुरस्कार घोषीत करण्यात आला. तर दुसरा पुरस्कार अमेरिकेतच सिल्वर स्क्रिन फ्लिम फेस्टिव्हलमध्ये ऑडियन्स अवॉर्ड देखील घोषीत झाला आहे. ‘अनफिट’ लघुपटात किन्नर समाजाची अवेहलना, त्यांना देण्यात येणारी वागणूक, शोषण आदी विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा लघुपट रुपेशराय सिकंद यांनी निर्मित केला असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे. लघुपटाचे वैशिष्ट्य म्हणजे बबली दास या किन्नरने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. पत्रकार अजय निक्ते यांनी या लघुपटात डान्सबार मालकाची प्रमुख भूमिका केली असून त्यांच्या या विशेष भुमिकेबद्दल चर्चा होत आहे. बॉलिवूडमधील जेष्ठ सिनेमॅटोग्राफार अक्रम खान यांनी कॅमेरामन म्हणून काम केले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर या लघुपटास अनेक महोत्सवांमध्ये जाण्याची संधी प्राप्त झाली आहे.