( अडीच तासांच्या आंदोलनाने प्रशासनाला रोखले, दीपेश म्हात्रेंचे तरुणांना दिलासा देण्याचे आश्वासन )
डोंबिवली : दिवाळी सणानिमित्त व्यवसायासाठी पुढे आलेल्या स्थानिक होतकरू तरुणांच्या समर्थनार्थ मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी मंगळवारी अनोखे आंदोलन छेडले. डोंबिवली पश्चिमेकडील शंभर मीटर रेल्वे स्टेशन परिसरात फटाके विक्रेत्यांवर जेसीबीच्या माध्यमातून कारवाई सुरू असताना प्रल्हाद म्हात्रे यांनी थेट जेसीबीच्या फावड्यात बसून ठिय्या दिला. तब्बल दोन ते अडीच तास चाललेल्या या आंदोलनामुळे पालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे दीडशे ते दोनशे स्थानिक तरुणांनी दिवाळी फराळ, फटाके, कंदील यांसारख्या वस्तू खरेदी करून हंगामी व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, मंगळवारी सकाळी ह प्रभागक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त विजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली यातील काही विक्रेत्यांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईला प्रल्हाद म्हात्रे यांनी तीव्र विरोध केला.
ही मुले कायमस्वरूपी फेरीवाले म्हणून व्यवसाय करणारे नाहीत. दिवाळी सणासाठी कर्ज काढून त्यांनी माल खरेदी केला आहे. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि चार पैसे कमावण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. एकीकडे सरकार तरुणांना व्यवसाय करण्याचे आवाहन करते आणि दुसरीकडे पालिका प्रशासन त्यांच्या रोजगारावरच हातोडा मारते. कारवाई करायची असेल तर आधी मला मारा, मला अटक करा; पण या तरुणांना रस्त्यावर येऊ देणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका म्हात्रे यांनी घेतली.
या आंदोलनामुळे काही काळ पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अधिकाऱ्यांसोबत चर्चा होऊनही तोडगा निघत नसल्याने आंदोलन सुरूच राहिले. दरम्यान, भाजपा नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य दीपेश म्हात्रे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिस्थिती जाणून घेत तरुणांची बाजू उचलून धरली. प्रल्हाद म्हात्रे यांची भूमिका योग्य असल्याचे सांगत या विषयावर महापौर आणि आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. तसेच स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत हा विषय मांडून तरुणांच्या व्यवसायासाठी मार्ग काढू, त्यांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

अखेर सहाय्यक आयुक्त विजय भोईर यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करावे लागत असल्याचे सांगत प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यास कारवाई केली जाणार नाही अशी भूमिका मांडली. दीपेश म्हात्रे यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास व्यक्त करत प्रल्हाद म्हात्रे यांनी आंदोलन मागे घेतले. जेसीबीच्या फावड्यातून बाहेर येताच उपस्थित तरुणांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
दिवाळीच्या निमित्ताने स्वतःचा छोटासा व्यवसाय उभा करू पाहणाऱ्या स्थानिक तरुणांचा रोजगार आणि पालिकेच्या कारवाईचा प्रश्न या आंदोलनामुळे चर्चेत आला आहे. आता या तरुणांना व्यवसायासाठी दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
© Copyright 2026. सर्व हक्क राखीव.
