दिव्यांग मुलांना आजन्म सांभाळणे एक मोठे कार्य — अविनाश बर्वे

डोंबिवली : आदिवासी, अपंग, दिव्यांग आणि अतिदुर्गम भागातील कलाकारांच्या विविध कलाकृच्या प्रदर्शनाचे ब्रीदवाक्य ‘प्रेरणा बना’ असे आहे. आणि तेच काम या ठिकाणी होत आहे. अस्तित्व दिव्यांगांची मातृसंस्था आहे. या संस्थेतून मुलं बाहेर पडल्यावर त्यांची आजन्म सोय व्हावी ही गरज निर्माण झाली. त्यातूनच घरकुल संस्थेचा जन्म झाला. परंतु दिव्यांग मुलांना आजन्म सांभाळणे म्हणजे एक मोठे कार्य आहे असे प्रतिपादन घरकुल संस्थेचे प्रमुख आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अविनाश बर्वे यांनी केले.

आदिवासी आणि विशेष मुलांच्या कलाकृतीचे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन महिला विभागातर्फे पूर्वेकडील सर्वेश सभागृहात आयोजित केले होते त्यावेळी बर्वे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या पीडीजी रोटरीयन कीर्ती वढाळकर, गुलाब पवळे, प्रेरणा पवळे, कैलास सोनावणे, स्नेहा शेंबेकर, पत्रकार जान्हवी मौर्या आदी मान्यवर उपस्थित होते.

बर्वे पुढे म्हणाले, विशेष काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये स्पर्धा कधीच नसते. विशेष मुलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळणे ही संस्थेची गरज आहे. या मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था असतील तर त्यातील केवळ पाच टक्के संस्थामध्येच वसतिगृह आहेत. व्यक्ती निरपेक्ष असलेल्या संस्था कमी आहेत.

तर कीर्ती वढाळकर म्हणाल्या, आदिवासी आणि विशेष मुलांना आपण एक दिवस पैसे देऊ शकतो ते फार काळ टिकणारे नाही. ही मुले स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम रोटरी ही संस्था करीत आहे.

विविध प्रांतातील आदिवासी, अपंग व्यक्ती आणि अतिदुर्गम भागातील कलाकार यांनी तयार केलेल्या विविध कलाकृती, खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी वस्तूंचे 26 स्टॉल प्रदर्शनात मांडयात आहे होते. प्रदर्शनात गरेलपाडा येथील आदिवासी महिलांच्या कलाकृती, आशाकिरण दिव्यांग संस्थेतील मुलांच्या वस्तू, आव्हान पालक संघटना, विवेकानंद सेवा मंडळ, प्रौढ मानसिक अपंग असलेल्याची प्रबोधन ट्रस्ट, राजहंस संस्था, परिवर्तन संस्था आदी संस्थांनी आपल्या वस्तू या प्रदर्शनात मांडल्या होत्या. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन महिला विभागातर्फे भरविण्यात आलेल्या अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे दुसरे वर्ष होते.