ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाचे रूप पालटणार [ आमदार निधीतून दहा लाखांची तरतूद ]

डोंबिवली : शहराचे भूषण असलेला ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगणामध्ये विविध स्थापत्य कामे करण्याकरिता स्थानिक आमदार सुभाष भोईर यांच्या आमदार निधीतून दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये विविध प्रकारचे राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. संकुलात मोठ्या प्रमाणावर खेळाडू सरावाकरीता येत असतात. येथील अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून डोंबिवली शहराचे नाव उज्वल केले आहे. त्यामुळे सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलामध्ये सरावा करीता येणाऱ्या खेळाडूंची चांगली सोय व्हावी याकरिता क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडा गृहाची रंगरंगोटी, जिन्याची रंगरंगोटी, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, मैदान दुरुस्ती, मैदानाच्या पायऱ्यांची रंगरंगोटी तसेच संपूर्ण मैदानाची साफसफाई आदी कामे करण्यात येणार आहेत. या सर्व कामांकरिता आमदार सुभाष भोईर यांच्या निधीतून दहा लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.