नांदिवलीत पाणी तुंबण्याची समस्या मार्गी लागणार ! ( नाले बांधणी व रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न )

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत डोंबिवली पूर्व विभागातील नांदिवली येथे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या येथील नागरिकांना रडकुंडीस आणत होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पावसाळ्या दरम्यान पहाणी दौरा करून नागरिकांना आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता म्हणून डॉ. शिंदे यांनी त्यांचा मुबलक निधी खर्ची करून पावसाळ्यात पाणी तुंबणे समस्या सोडविण्यासाठी ठोस अशा विकास कामाचे भूमिपूजन करून त्या कामाला सुरूवात केली.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर झालेल्या कामांचा शुभारंभ बुधवारी १० नोव्हेंबर रोजी डोंबिवली पूर्व विभागात संपन्न झाला. यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, नगरसेविका रुपाली म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी सरपंच रवी आंबो म्हात्रे, उमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.दरम्यान प्रभागातील महिलांनी डॉ. शिंदे यांच्याकडे पाण्याची व अंतर्गत रस्ताबाबत सूचना मांडल्या. गेले दोन महिने पाण्याची समस्या असून अंतर्गत रस्ता नसल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे. यावर नगरसेविका रुपाली म्हात्रे यांनी व रवी म्हात्रे यांनी एमआयडीसीकडून येणाऱ्या पाण्याचे प्रेशर वाढविण्याची गरज असल्याचे खासदारांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच अंतर्गत नवा रस्ता करण्यासाठी पालिका प्रशासनाबरोबर बसून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी खात्री दिली.नंदिवली येथील पावसाळ्यात पावसामुळे तुंबणाऱ्या पाण्याची समस्या मार्गी लागणार असल्याचे यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक 112 मंगलदीप सोसायटी ते आशापुरा आर्केड दरम्यान काँक्रीटीकरण रस्ता आणि नांदिवली पंचानंद येथील नांदिवली नाला ते लाईफ केअर हॉस्पिटलपर्यंत मोठा नाला बांधण्यात येणार असून त्या कामाला तात्काळ सुरुवात होणार अडल्याचेही शिंदे यांनी सांगितले. यासाठी नगरसेविका रुपाली म्हात्रे, रवी म्हात्रे, उमेश पाटील, सुधीर पाटील यांच्या सूचनेनुसार नाल्याचे काम होत असून आता भविष्यात पाणी तुंबण्याची समस्या दूर होईल असेही सूचीत केले.