प्रत्येक महिलेने आपल्या घरात सावित्रीबाई फुले यांचा फोटो लावावा !

( जिल्हा सरचिटणीस शामराव यादव यांचे प्रतिपादन )

डोंबिवली : आज महिला मोठ्या पदावर कार्यरत आहेत. महिलांना प्रत्येक क्षेत्रात मानसन्मान मिळत आहे. नुकतीच सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळीही विभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सावित्रीबाईंच्या चळवळीमुळेच महिलांना शिक्षण मिळाले आणि महिला घराबाहेर येऊन कार्यरत राहिल्या. त्यांच्या भरीव कार्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात महिला मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळेच प्रत्येक महिलेने आपल्या घरात सावित्रीबाई फुले यांचा फोटो लावावा असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली जिल्हा शहर काँग्रेस कमिटी सरचिटणीस शामराव यादव यांनी डोंबिवलीत केले.

कल्याण डोंबिवली जिल्हा शहर काँग्रेस कमिटी आणि स्काय फाउंडेशन यांच्या माध्यमातून शामराव यादव काँग्रेस जनसंपर्क कार्यालय, परी प्लाझा, निळजे स्टेशन रोड, गावदेवी चौका, निळजे, लोढा हेवन, डोंबिवली पूर्व येथे एकल महिला व विधवा महिला यांच्यासाठी विशेष हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश महिला महासचिव वर्षा गुजर-जगताप, जिल्हा सरचिटणीस शामराव यादव, आदी मान्यवर उपस्थित होते.

यादव यांनी पुढे सांगितले, कुटूंबातील कोणालाही शिक्षणासाठी काही मदत हवी असल्यास अवश्य आमच्या कार्यालयात भेट द्यावी. विभागात रस्ता, वीज, कचरा, पाणी यांसारखे प्रश्न भेडसावत आहेत त्याकडे लक्ष देणार असून याव्यतिरिक्त काही समस्या असतील तर आपण सर्व एकत्रितपणे काम करू. येथील पायाभूत आणि मूलभूत गरजा पूर्ण होऊन येथील विकास होणे हेच आपले ध्येय आहे.

तर यावेळी रत्नप्रभा म्हात्रे आणि वर्षा गुजर-जगताप म्हणाल्या, पक्षीय भेदभाव विसरून काम केले तर नक्कीच विकासाची कामे होतात. हा आपला भाग आहे तो चांगला राहण्यासाठी प्रत्येकांनी पुढे येऊन मार्ग काढला तर कोणतीही समस्या राहणार नाही.

हळदीकुंकू कार्यक्रम निमित्त उपस्थित महिलांना भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चंदा यादव, माया रुके, सुजाता काटे, अश्विनी यादव, वर्षा कांबळे, कोमल यादव, श्रुतिका काटे, दीपा मोरे, पवार, गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.