डोंबिवली : स्थानिक आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत खाडीकिनारा आणि परिसर स्वच्छ व मनमोहक व्हावा या उद्देशाने करोडो रुपयांचा स्वतःचा निधी जुनी डोंबिवली विभागात विकासकामांकरिती खर्ची केला. यातून सौंदर्यपरीपूर्ण गणेशघाट व काँक्रिट रस्त्याची निर्मिती झाली. या दोन्ही विकास कामांचे उदघाटन आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.

भाजप प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विशेष निधीतून जुनी डोंबिवली परिसरात काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रस्त्याचे उद्घाटन केले. जुनी डोंबिवली अंडरपासकडून गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था वाईट झाली होती. खराब रस्त्यामुळे अंडरपासमधून गणेश घाटाकडे जाणाऱ्या वाहन चालकांना व नागरिकांना त्रास होत होता. स्थानिक भूमिपुत्र आणि जुनी डोंबिवलीतील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन आमदार व माजी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विशेष निधीतून नवीन काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. परिणामी काँक्रीटचा मजबूत रस्त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान मूर्ती विसर्जनासाठी जाणाऱ्या वाहनचालकांना तसेच गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे.

सदर लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी महिसांसाठी हळदीकुंकू समारंभ व महिलांसाठी विविध खेळ, बक्षिसे आणि नऊवारी नेसून येणाऱ्या महिलांसाठी आकर्षक खास बक्षिस ठेवण्यात आले होते. रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर (नंदू) परब, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस, ग्रामस्थ दीपक ठाकूर, डोंबिवली पश्चिम मंडल उपाध्यक्ष कृष्णा पाटील, रसिका कृष्णा पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.