डोंबिवली : नर्मदा परिक्रमेच्या वेळी माझ्याबरोबर स्वामी समर्थांच्या पादुका होत्या. स्वामी समर्थांच्या पादुकांसमवेत परिक्रमा करताना आनंद तर झालाच. नर्मदा परिक्रमा खरोखरीच आनंदयात्रा झाली. मनाला अतीव समाधानही मिळाले असे प्रतिपादन लेखक, व्याख्याते व चार वेळा नर्मदा परिक्रमा करणारे उदयन आचार्य यांनी केले.

पूर्वेकडील स्वामींच्या घराच्या अंतर्गत चैतन्यप्रभा मंडळ आयोजित समर्थ व्याख्यानमालेत लेखक, व्याख्याते व चार वेळा नर्मदा परिक्रमा करणारे उदयन आचार्य बोलत होते. या कार्यक्रमास माजी मंत्री जगन्नाथ पाटील, मोरया प्रकाशनाचे प्रकाशक दिलीप महाजन, स्वामींच्या घराच्या संचालिका माधवी सरखोत, चैतन्यप्रभा मंडळाच्या डॉ.अनुराधा कुलकर्णी, स्मिता तळेकर, मीना गोडखिंडी आदी व्यासपीावर उपस्थित होते.

उदयन आचार्य पुढे म्हणाले, नर्मदा परिक्रमेत दररोज या पादुकांचे राजोपचारी पूजन करण्यास दोन तास लागत होते. शिवाय माझी नित्यनेमाची साधना होतीच. कधी कधी खूप अडचणींना सामोरे जावे लागले. नर्मदा मैय्याने खूप कठोर मानसिक व शारीरिक परिक्षा घेतली. कधी तापाने बेजार झालो तर कधी गुडघेदुखीने त्रस्त झालो. पण नर्मदा मैय्याच्या सर्व परिक्षेत मी पास झालो. माझ्याबरोबर असलेल्या किरण पाटील व अविनाश घेवारी या साधकांनी माझी काळजी घेतली. या परिक्रमेत नर्मदा मैय्याने माझ्याकडून देहातीत होण्याची साधना करून घेतली. तसेच कठोर तप:साधनेची परिक्षा घेतली. निश्चयाची दृढता मैय्याने बघितली व मग मैय्याने स्व:ताच साधकावर प्रेमाचा व वात्सल्याचा वर्षाव करून चवथी परिक्रमा सुफळ संपूर्ण करून घेतली.

दरम्यान नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा हे पुस्तक प्रकाशित करताना आम्हाला खूप समाधान वाटले असे प्रकाशक दिलीप महाजन यांनी सांगितले. तर नर्मदा परिक्रमा चार वेळा पूर्ण केल्याने ते अनुभव समृद्ध झाले आहेत. सकारात्मक विचार असेल तर अवघड गोष्टी सहजपणे साध्य होतात असे जगन्नाथ पाटील म्हणाले.
सदर कार्यक्रमात उदयन आचार्य, जगन्नाथ पाटील, दिलीप महाजन व उदयन आचार्य यांच्या बरोबर नर्मदा परिक्रमा करणारे किरण पाटील व अविनाश घेवारी यांचा समयोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्यप्रभा मंडळाच्या मीना गोडखिंडी यांनी केले तर आभार प्रदर्शन स्मिता तळेकर यांनी केले. या कार्यक्रमास डॉ.सच्चिदानंद शेवडे, माजी महापौर अनिता दळवी, मोरया प्रकाशनाच्या सुरेखा महाजन, योगिनी आठल्ये आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षवेधी होती.