डोंबिवली : पी. अँड टी. कॉलनी, समर्थ रामदास स्वामी चौक येथील श्री महाविष्णू मारुती मंदिर देवस्थान समितीतर्फे शनिवारी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गोविंदा पथके व भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडण्यात आली. दहीहंडी फोडणाऱ्या पथकासाठी २१ हजार रुपयांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले.

परंपरा व संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने मंदिर संस्थानतर्फे दरवर्षी दहीहंडीचे आयोजन केले जाते. यंदा सुरक्षिततेला प्राधान्य देत पाच थरांपेक्षा अधिक थर लावण्यास मनाई करण्यात आली. लहान मुले आणि गोविंदांच्या सुरक्षिततेचा विचार करून पाच थरांवरच दहीहंडी फोडण्यात आली. दहीहंडी उत्सव आनंदाचा असावा तो जीवघेणा ठरू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
उत्सव समितीचे प्रमुख रवि म्हात्रे, अध्यक्ष संदीप दिघे, सचिव रामभाऊ देसले, कोषाध्यक्ष रविंद्र पाटील, उपाध्यक्ष संतोष नारकर, सहसचिव सुधाकर पोहेकर, अंतर्गत हिशोब महेश कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. मंदिर ट्रस्टचे तसेच पेंटिंग कॉर्नरचे कार्यकर्तेही उत्सवाच्या नियोजनासाठी सहभागी झाले होते.
