शिवमंदिर दहीहंडीत गोविंदांचा जल्लोष, महिलांसाठी लकी ड्रॉची पर्वणी

डोंबिवली : पूर्वेतील शिवमंदिर रोड, संगीतावाडी येथे आमदार राजेश मोरे व नगरसेविका भारती राजेश मोरे यांच्या पुढाकाराने आयोजित भव्य दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला. हजारो गोविंदांच्या उपस्थितीत झालेल्या या उत्सवात दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांच्या रांगा लागल्या होत्या. यंदा सुमारे १०० ते १५० गोविंदा पथकांनी नोंदणी केली होती.

दहीहंडी हा उत्सव समाजातील नागरिकांना एकत्र आणत बंधुभावाचे नाते दृढ करणारा असल्याचे यावेळी नगरसेविका हर्षल राजेश मोरे यांनी सांगितले. गोविंदा पथकांनी सुरक्षिततेला प्राधान्य देत उत्सवात सहभागी व्हावे तसेच समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थितांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, दहीहंडी उत्सवानंतर गृहिणी महिलांसाठी विशेष लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांचा सन्मान आणि त्यांच्या आनंदासाठी आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लकी ड्रॉमुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाला माजी नगरसेवक राजन मराठे, नगरसेविका सौ. दिपाली पाटील, विभागप्रमुख स्वप्नील पाटील, सतीश मोडक, सुनील पवार, शाखाप्रमुख कैलास कदम, अनिल कदम, रमेश धामापुरकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होत्या.