( १२ ज्योतिर्लिंग आणि महाकालचा आकर्षक देखावा )
डोंबिवली : गणेशोत्सवात सगळीकडे आरतीचा गजर आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपल्या माणसांसोबत सण साजरा करण्याचा आनंद प्रत्येकाला मिळावा या उद्देशाने डोंबिवलीतील साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही बाप्पाचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले असून त्यांच्या आगमनाने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात गेल्या १२ वर्षांपासून गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान केली जाते. गणेशोत्सवाच्या काळात येथील वातावरण पूर्णपणे बदलून जाते. आरती, पूजा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये आजी-आजोबा उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. त्यामुळे त्यांना आपल्या घरातील गणेशोत्सवाची आठवण करून देणारे आनंदाचे क्षण अनुभवता येतात.

साधना आधार वृद्ध सेवा केंद्राच्या संचालिका सुमेधा थते यांच्या सामाजिक कार्याला यंदा १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात वृद्धांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना केवळ निवारा न देता त्यांना आपलेपणा, सण-उत्सवांचा आनंद आणि आनंदी वातावरण मिळावे यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे. विसर्जनानंतर मूर्तीची शाडूची माती पुन्हा रोपांमध्ये वापरण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही या उपक्रमातून दिला जात आहे.
यंदा वृद्ध सेवा केंद्रात १२ ज्योतिर्लिंग आणि महाकालचा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळे देखावे उभारले जातात. असे देखावे पाहण्यासाठी भाविक आणि नागरिकही येथे भेट देतात. नागरिकांच्या भेटीमुळे आजी-आजोबांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
गणेशोत्सवाच्या काळात आरती, पूजा आणि विविध कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिक सहभागी होत असून बाप्पाच्यामुळे वृद्धाश्रमातील वातावरण भक्तिमय तसेच आनंदी झाले आहे. घरापासून दूर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सणाच्या निमित्ताने आपुलकी आणि कुटुंबातील सदस्यांसारखे वातावरण मिळावे हा या उपक्रमामागील उद्देश आहे असे सुमेधा यांनी यावेळी सांगितले.
