डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या समस्या, सूचना, तक्रारी तसेच प्रलंबित प्रश्न थेट मांडता यावेत, यासाठी ऑफिस ऑफ डॉ. श्रीकांत शिंदे च्या माध्यमातून अधिकृत संपर्क व्यवस्था आणि संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना 93765 67567 या संपर्क क्रमांकावर तसेच officedrshrikantshinde.com या संकेतस्थळाद्वारे आपल्या समस्या आणि सूचना कार्यालयापर्यंत पोहोचवता येणार आहेत.

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विविध माध्यमातून संवाद साधत आहेत. खासदार आपल्या भेटीला, जनता दरबार यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर संबंधित शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय साधला जातो.
नागरिकांच्या अनेक समस्या महापालिका, शासकीय विभाग, स्थानिक प्रशासन किंवा अन्य सार्वजनिक यंत्रणांशी संबंधित असतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरबसल्या किंवा आपल्या सोयीच्या वेळेनुसार समस्या मांडता याव्यात, या उद्देशाने ही अधिकृत संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रस्ते, पाणी, वाहतूक, आरोग्य, सार्वजनिक सुविधा, शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रलंबित कामे तसेच अन्य नागरी प्रश्न नागरिकांना या माध्यमातून मांडता येणार आहेत. समस्या मांडताना आवश्यक माहिती, संबंधित कागदपत्रे, छायाचित्रे किंवा इतर तपशील दिल्यास त्यावर पाठपुरावा करण्यास अधिक सुलभता होणार आहे.
प्राप्त तक्रारी व निवेदनांची माहिती घेऊन संबंधित विभागाशी संपर्क साधत आवश्यक कार्यवाहीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावाही घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांसाठी अधिकृत संपर्क :
संपर्क क्रमांक : +91 93765 67567
संपर्काची वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६
संकेतस्थळ : officedrshrikantshinde.com
नागरिकांनी आपल्या समस्या, सूचना आणि तक्रारी अधिकृत माध्यमातून कार्यालयापर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन ऑफिस ऑफ डॉ. श्रीकांत शिंदे च्या वतीने करण्यात आले आहे.
