नीलजे परिसरात नव्या दंत रुग्णालयाची सुविधा : पलावा डेंटल हॉस्पिटल अँड इम्प्लांट सेंटरचे उद्घाटन

डोंबिवली : नीलजे, लोढा हेवन आणि पलावा परिसरातील वाढती लोकवस्ती लक्षात घेता नागरिकांना दंत उपचारांसाठी स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने नीलजे येथे पलावा डेंटल हॉस्पिटल अँड इम्प्लांट सेंटर सुरू करण्यात आले आहे. या दंत रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.

नीलजे-पलावा परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून आरोग्य सुविधांची गरजही त्याच प्रमाणात वाढत आहे. दंत उपचारांसाठी नागरिकांना दूरच्या भागात जावे लागू नये यासाठी परिसरातच दंत चिकित्सा सुविधा उपलब्ध होणे महत्त्वाचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या केंद्रातून विविध दंत उपचार तसेच इम्प्लांटसंबंधी सेवा उपलब्ध होणार आहेत.

उद्घाटनप्रसंगी आमदार राजेश मोरे यांनी परिसरातील नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणे ही सकारात्मक बाब असल्याचे सांगितले. आरोग्य क्षेत्रातील अशा सुविधांमुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा त्रास कमी होण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.
या वेळी डॉ. हितेंद्र यादव
(MDS – Prosthodontics), डॉ. नेहा यादव (BDS), डॉ. बी. बी. यादव (MD – Medicine, Nulife Hospital, Dombivli), तसेच प्रगती कॉलेज, डोंबिवलीचे ट्रस्टी विजय पाटील यांच्यासह डॉक्टर, मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

वाढत्या नागरी वस्तीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्यसेवेबरोबरच दंत आरोग्याबाबतही नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. नियमित दंत तपासणी आणि वेळेवर उपचार यामुळे दात व हिरड्यांशी संबंधित अनेक समस्या टाळता येऊ शकतात. या दृष्टीने परिसरात उपलब्ध झालेली दंत चिकित्सा सुविधा नागरिकांसाठी उपयोगी ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.