पालिका अधिकाऱ्यांच्या दडप शाहीला व्यापाऱ्यांचा विरोध

पालिका अधिकाऱ्यांच्या दडप शाहीला व्यापाऱ्यांचा विरोध
डोंबिवली, दि. २४ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी काढलेल्या प्लास्टिक मुक्त पालिका फतव्याचा गोंधळ उडाला असून त्याचा फटका सामान्य व्यापाऱ्यांना होत आहे. पालिका अधिकारी व्यापाऱ्यांशी दडपशाही करीत असून आता व्यापार करणे कठीण होत आहे अशा तक्रारी करीत आहेत. दुकानात अधिकारी घुसून चक्क दादागिरीची भाषा करीत आहेत. या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची तक्रार व्यापाऱ्यांनी प्रभाग क्षेत्र सभापती खूशबु चौधरी यांच्याकडे केली.

आज पालिकेच्या आंबेडकर सभागृहात डोंबिबलीतील सुमारे पन्नास दुकानदार व्यापाऱ्यांनी चौधरी यांची भेट घेऊन त्यांनी प्लास्टिक मुक्ती विषयावर समस्या मांडल्या. दुकानदारांच्या या शिष्टमंडळात रेडिमेड कापड दुकानदार, स्टेशनरी, किराणा, होजियारी आदी उद्योग करणारे दुकानदार होते. त्यांच्या मते कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकचे वापर करायचे आणि कोणते नाही याची काहीच रूपरेषा नाही. अधिकारी चक्क दुकानात घुसून नाहक त्रासदायक कारवाई करीत आहेत. अखेर ग्राहकांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका अधकाऱ्यांसमोर अधिकारिि व व्यापारी यांची बैठक घेऊन अनेक बाबी चौधरी यांनी उघड करून घेतल्या. यावेळी नगरसेवक संदीप पुराणिक, उपायुक्त धनाजी तोरस्कर, आरोग्य अधिकारी विलास जोशी तसेच त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत व्यापारी पालिकेच्या कार्याशी समरस असून कचरा मुक्तीसाठी तयार आहेत. परंतु उगाच त्रास द्यायचा म्हणून कारवाई नको तर जो उद्देश आहे तो सफल झाला पाहिजे. फलक बाजी करून समस्या सुटत नाही. तसेच पालिका अधिकारी नको त्या गोष्टींचा औदुंबर करून कायद्याचा धाक दाखवू व्यापाऱ्यांना जेरीस आणत आहेत अशा तक्रारी बैठकीत करण्यात आल्या. प्रभागक्षेत्र सभापती खुषबु चौधरी यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले की व्यापाऱ्यांना त्रास न देता पालिकेचा उद्देश साध्य करावा. नागरिक, व्यापारी यांच्या सहकार्यानेच चांगले कार्य तडीस जाईल असे सांगून आम्ही व्यापाऱ्यांचा बाजूने आहोत. अधिकाऱ्यांची दडपशाही चालणार नाही.