प्रशिक्षण शिबिरार्थीचे प्रमाणपत्र देऊन केला गुणगौरव

डोंबिवली, दि. ०८ (प्रतिनिधी) : इंडोटेक फाऊंडेशन आणि युग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. सदर शिबिरात तरुणींनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. “उद्योजक व्हा” या संकल्पनेला मिळालेला मोठा प्रतिसाद आणि सहभागी प्रशिक्षण शिबिरार्थीना प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात दोन महिन्यात प्रत्यक्ष लघुउद्योग सुरु करणाऱ्या महिलांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.

महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील आंबेडकर सभागृहात प्रशिक्षण शिबिरार्थीना प्रमाणपत्र प्रदान आणि उद्योजक महिलांचा गुणगौरव कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पालिकेच्या महिला बालकल्याण समिती सभापती वैशाली पाटील, युग फाऊंडेशनच्या संस्थापिका कल्पना किरतकर, बसपाचे राज्य सचिव दयानंद किरतकर, नगरसेवक महेश पाटील, प्रकाश भोईर, संदीप पुराणिक आणि शिवसेना महिला संघटक कविता गावंड, प्रशिक्षण शिबीर आयोजिका रेश्मा खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयोजिका खरात म्हणाल्या, महिलांनी स्वयंसीद्ध व्हायलाच पाहिजे यासाठी एक महिन्याचे प्रशिक्षण घेण्यात आले होते आणि त्याला चांगल प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षण शिबिरात तीनशे महिलांचा सहभाग लाभला. तसेच यामध्ये केंद्र-राज्य शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. शिबिरात ब्युटीपार्लर, ड्रेस डिझायनिंग, योगा थेरीपीस्ट, नॅचरोथेरपी, ज्वेलरी अशा विविध सबसिडी तसेच मोफत कोर्सेसचे प्रशिक्षण घेण्यात आले. विशेष म्हणजे हा कोर्स करून काही महिलांनी स्वयंरोजगार सुरु केला याचा आनंद होत आहे. तर कल्पना किरतकर यांनी महिलांनी दिलेल्या योगदानाबद्द कौतुक करून महिलांनी स्वावलंबी व्हायलाच पाहिजे असे सांगितले. तर दयानंद किरतकर म्हणाले, जसं यशस्वी उद्योजक पुरुषाच्या मागे महिलांचं पाठबळ लागत तसं यशस्वी महिला उद्योजिकेलाही पुरुषांच पाठबळ मिळायलाच पाहिजे असे सांगून प्रत्यक्ष लघुउद्योग करणाऱ्या महिलांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू खरात, अस्मिता जैयस्वाल, स्वाती वाव्हळ, निकिता गवारे, कविता शेळके, रेखा कांबळे, प्रीती पाठक, प्रिया पाठक, राकेश गुप्ता, लक्ष्मन अगरवाल, अब्दुल शेख आदींनी विशेष मेहनत घेतली.