कंपनीच्या भिंतीला भगदाड पाडून सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल लंपास
कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील एम.आय.डी.सी. मधील बंद कंपनीच्या संरक्षक भिंतीला भगदाड पाडून कनेक्टवेल इंडस्ट्रीज प्रा. ली. डी – १२ या कंपनीत प्रवेश करत कंपनी मधील पाच लाख ९८ हजार ६७८ रुपये किमतीच्या कॉपर वायर्स चे बंडल चोरून नेले. सदर प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील एम.आय.डी.सी. परिसरातील कनेक्टवेल इंडस्ट्रीज प्रा. ली. या कंपनीतील पाच लाख ९८ हजार ६७८ रुपये किमतीच्या कॉपर वायर्स चे १३ बंडल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या चोरट्यांनी या कंपनीच्या शेजारी बंद असलेल्या कंपनीच्या संरक्षक भिंतीला भगदाड पाडत या कंपनीत प्रवेश करत लाखोच्या कॉपरच्या वायर्सच्या बंडलावर डल्ला मारला. सकळी सदर बाब निदर्शनास येताच याबाबत मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
धक्का मारून मोबाईल लांबवला
कल्याण : पश्चिम येथे लागोपाठ दोन इसमांना धक्का मारत त्यांचा मोबाईल लंपास करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. कल्याण पूर्वेकडील नांदिवली परिसरात राहणारे दिलीप राणे हे गुरुवारी रात्री आठ च्या सुमारास पश्चिमेकडील अन्नपूर्णा हॉटेल समोरून पायी जात असताना एका अज्ञात इसमाने त्यांना धक्का मारत हातचलाखीने त्याचा मोबाईल लांबवला. काही वेळाने त्यांना मोबाईल लंपास केल्याचे लक्षात आले. कल्याण शीळ रोड वरील रिव्हर वूड पार्क मध्ये राहणारे अवधूत सावंत शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील आग्रा रोड येथील नमस्कार मंडळासमोरून जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांना धक्का मारत हातचलाखीने त्यांच्या खिसातील मोबाईल काढून पळ काढला.
बेकादेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री प्रकरणी तीन महिलांविरोधात गुन्हे दाखल
कल्याण : पूर्वेकडील पिसावली येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती स्थानिक मानपाडा पोलीसाना मिळाली होती या महितीनुसार काल सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी पिसावली येथील महात्मा गांधी नगर मधील एका घरावर छापा मारत तीन महिलांना ताब्यात घेतले तसेच या ठिकाणी असलेली दारू व इतर साहित्य जप्त केले. उमाबाई चव्हाण, मीराबाई घोडके, नंदा कसबे अशी या महिलांची नावे आहेत.