डोंबिवली, दि. १० (प्रतिनिधी) : एका सराईत चोरट्याला अटक करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. 13 घरफोड्यांची कबूली देणाऱ्या या चोरट्याकडून पोलिसांनी 6 लाख 50 हजार रूपयांचा चोरीची माल हस्तगत केला असून या चोराकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता परिमंडळ 3 चे उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी व्यक्त केली.
राम मंजु गुप्ता (35) असे त्याचे नाव असून मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील रहिवासी असलेला हा चोरटा दिवा गावातील शांताबाई चाळीत चोरी-छुपे राहत आहे. निवासी विभागातील मिलापनगरमध्ये असलेला प्रशांत सिन्हा यांचा श्रावण बंगला फोडला. त्यानंतर डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र वाडेकर, मानपाड्याचे वपोनि गजानन काब्दुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि. नारायण देशमुख, फौजदार विजय मोरे यांच्यासह सुशील हांडे, विलास पाटील, निलेश पाटील, प्रफुल्ल गांगुर्डे या स्वतंत्र पथकाने तपास चक्रांना वेग दिला. खबरीने दिलेल्या अचूक माहितीनुसार या पथकाने दिव्यातील शांताबाई चाळीतील एका खोलीत लपून बसलेल्या चोरट्याच्या मुसक्या बांधल्या. कस्सून चौकशी केल्यानंतर या चोरट्याने प्रशांत सिन्हा यांचा श्रावण बंगला फोडल्याशिवाय अन्य 12 घरे लागोपाठ फोडल्याची कबूली दिली. या चोरट्याकडून सोन्याचे विविध प्रकारचे अलंकार, महागडे घड्याळ व कॅमेरा, काही रोकड असा 6 लाख 50 हजार रूपये किंमतीचा चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून कल्याण कोर्टाने दिलेल्या पोलीस कोठडीची आदेशानुसार अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.