दोन अर्भकांना सोडून अज्ञातांचे पलायन
डोंबिवली : डोंबिवली पुर्वेकडील जननी आशिष ट्रस्टच्या गेटबाहेर एक पुरुष जातीच्या तर एक स्त्री जातीच्या अर्भकाला सोडून अज्ञातांनी पलायन केले. सदर बाब निदर्शनास येताच याबाबत मानपाडा पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिमखाना रोडला असलेल्या जननी आशिष ट्रस्ट या संस्थेच्या गेट बाहेरील पाळण्यात एक स्त्री जातीचे अर्भक ठेवून अज्ञात इसमाने पळ काढला. तर सोमवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमरास अज्ञात इसमांनी याच ट्रस्टच्या गेट बाहेरील पाळण्यात पुरुष जातीचे अर्भक ठेवून पळ काढला. या दोन्ही प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी या बाळांना ठेवून पळालेल्यांचा शोध सुरू केला आहे.
सेटटॉप बॉक्स : केबल कर्मचाऱ्यावर हल्ला
डोंबिवली : कल्याण-मलंग रोडला असलेल्या नेवाळी नाका येथील बालाजी कॉलनीत बालाजी केबलच्या कार्यलयात याच परिसरात राहणारे दीपक भोई व त्यांची पत्नी रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आले. त्यांनी कार्यलयातील कर्मचाऱ्यांना सेटटॉप बॉक्स लवकर लावण्यासाठी सांगत त्यांच्याशी हुज्जत घातली. यावेळी रणजित नावाच्या कर्मचाऱ्याने त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र भोई यांनी त्यांना शिविगाळ करत धक्काबुक्की केली. तरीही रणजित याने भोई यांना समजविण्याचा प्रयत्न केला. तथापी संतापलेल्या भोई यांनी रणजितच्या डोक्यात काठीने हल्ला चढविला. या हल्ल्यात रणजित जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याच दरम्यान या कार्यलयातील 22 हजार रुपयांची रोकड ही गहाळ झाली असून ही रक्कम भोई यांनी नजर चूकवून काढून घेतली असल्याचा संशय जखमी रणजितने मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी हल्लेखोर दीपक भोई व त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
रिक्षाच्या धडकेत इसम जखमी
डोंबिवली : डोंबिवली पुर्वेकडील दत्तनगर (सुदामावाडी) येथील रमेश म्हात्रे बिल्डिंगमध्ये सर्जेराव यादव हे राहतात. गुरूवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास यादव हे शिवमंदिर रोडने गुरूदेव हॉटेल समोरून जात होते. अचानक पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाने त्यांना धडक दिली. या अपघातात यादव जखमी झाले. त्यांना रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी सोमवारी सायंकाळी उशिराने डोंबिवली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फरार झालेल्या उन्मत्त रिक्षावाल्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.