गुन्हे वार्ता

कल्याण डोंबिवली एका गाडीसह रिक्षा लंपास

डोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसरात वाहन चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला आहे. काल डोंबिवली पूर्वेकडील शिवाजी पथ येथील भागीरथी सदन मध्ये राहणारे हेमंत सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या मालकीची इन्होवा गाडी बुधवारी रात्रीच्या सुमारास इमारतीशेजारी लावून ठेवली होती. अज्ञात चोरट्याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरून नेली. याप्रकरणी सहस्त्रबुद्धे यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तर दुसरी घटना कल्याण पश्चिमेकडील बाजारेपठ परिसरात घडली आहे. कल्याण पश्चिमेकडील जागर मजीद इमारती मध्ये राहणारे मुजम्मील मजीद यांच्या मालकीची रिक्षा त्यांनी काल घराशेजारी उभी करून ठेवली होती काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने हि रिक्षा चोरून नेली. सकाळी हि बाब निदर्शनास येताच त्यांनी याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानाकात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. तर वाढत्या वाहन चोऱ्यामुळे नागरिक मात्र धास्तावले आहेत.

भरधाव टेम्पोची 14 वर्षाच्या मुलाला धडक

कल्याण : कल्याण तिसगाव परिसरात संतोषनगर येथील वर्ष अपार्टमेंट मध्ये राहणारा आदित्य गुप्ता हा विद्यार्थी काल सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास लोकग्राम परिसरातून पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या तीन चाकी टेम्पोने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी टेम्पो वाहन हयगयीने व बेदरकार पणे चालवत अपघात केल्याचा ठपका ठेवत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रिक्षा चालकाची वाहतूक पोलिसाला मारहाण

कल्याण : कल्याण डोंबिवली मध्ये रिक्षा चालकांची मुजोरी दिवसागणिक वाढत चालाली असून या बेशिस्त रिक्षा चालकवर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेकडील मोहिंदर काबुल सिंग येथे रस्त्यात बेशिस्त पणे रिक्षा उभी करत वाहतुकीला अडथला निर्माण करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई सुरु असताना राहुल कारंडे व बाळा ठाकूर या दोन रिक्षा चालकांनी कारवाई करणाऱ्या पोलीस नाईक नामदेव हिमगिरे याच्याशी हुज्जत घालत त्याना ठोशा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एका वाहन चालकाने एका महिला ट्राफिक वार्डनला मारहाण केली होती तर त्यापाठोपाठ कल्याण वाहतूक शाखेच्या कार्यालयातही एका इसमाने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ पुन्हा ही घटना घडल्याने अशा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

कल्याणात घरफोडी

कल्याण : कल्याण पूर्वेकडील मलंग रोड नांदिवली येथील डॉल्फिन इमारती मध्ये राहणारे नामदेव काळोखे हे काल दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारस घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या किंचनच्या स्लायडिंगच्या खिडकीतून घरात प्रवेश करत घरातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेवून तो पोबारा केला. काळोखे तासाभराने घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी काळोखे यांनी कोलसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

४७ हजारांची सिगारेपाकीटे लंपास

कल्याण : कल्याण पूर्वेकडील कचोरे परिसरात राहणारे सतेन्द्र कुमार सिंग हा सेल्समन असून त्याने सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नेतिवली परिसरात नेतिवली पोलीस चौकी जवळील गावदेवी पान स्टॉल मध्ये ४७ हजार ७३८ रुपयाचे विविध कंपन्यांचे सिगारेट्सची पाकीट असलेली बग ठेवली होती. अज्ञात चोरट्याने ही बॅग चोरून नेली. ही बाब लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.