डोंबिवली, दि. १४ (प्रतिनिधी) : रस्त्यांवर उत्सवासाठी मंडप उभारण्यास मनाई असली तरी सर्व नियमाचे पालन करत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र डोंबिवलीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पोलिस टार्गेट करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील कोल्हापुरे चौकात गेली अनेक वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या मंडळाने १८ फूट उंच गणरायाची मूर्ती बसविण्याचे ठरविले असून सजावटीचे काम सुरु आहे. मात्र अचानक पोलीस आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंडप टाकण्यास मनाई केल्याचे मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेळहके (कोल्हापुरे) यांनी सांगितले. रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा न येता आम्ही गेली अनेक वर्ष गणेशोत्सव साजरा करीत आहोत. सर्व सजावट, मूर्तीची उंची इत्यादी कामे केली आहे. मात्र पोलिसांनी वाहतुकीला अडथळा होत असल्याचे कारण पुढे करत मंडप लहान करण्यास सांगितले. वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून सहा फूट जागा सोडली आहे. या जागेवरून बसेस, रिक्षा व इतर वाहतूक व्यवस्थित होते. पोलीस आता आयत्या वेळी विरोध करत आहेत. यासंदर्भात मंडळाने डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी याना संपर्क केला. चौधरी आणि उपशहर प्रमुख किशोर मानकामे यांनी सदर ठिकाणची पाहणी केली. पोलीस जरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना टार्गेट करत असली तरी शिवसेना या मंडळाच्या पाठीशी उभी आहेत असे शहरप्रमुख चौधरी यांनी सांगितले. पश्चिम विभागात तीन तर पुर्वेकडील काही गणेश मंडळांच्या अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्या असल्याचे चौधरी यांनी सांगितले.