डोंबिवली, दि. १४ (प्रतिनिधी) : उमंग फॉउंडेशान आणि अविष्कार अंतर्गत “हृदयांतर ब्लॉग कॉम” आयोजित पावसाळी स्वरचित कविता स्पर्धेचा गौरव समारंभ नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेत महाराष्ट्रातून अनेक कवींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. स्पर्धेमधून तीन विजेत्यांची निवड करण्यात आली तर काहींना उत्कृष्ठ कविता म्हणून सन्मानित करण्यात आले.
पूर्वेकडील टंडन रोड येथील “द आर्ट स्टुडिओ” सभागृहात पावसाळी स्वरचित कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या आणि परीक्षक म्हणून कवियत्री छाया घाडगे उपस्थित होत्या.
परीक्षक छाया घाडगे यांनी सादर करण्यात आलेल्या सर्व कविवर्यांचे कौतुक केले. त्या पुढे म्हणाल्या, कविता आपल्या मनातील भावना प्रकटीकरण करण्याच एक प्रभावी माध्यम आहे. कविता हृदयस्पर्शी होत्या तर काही वास्तवदर्शी आणि प्रबोधनात्मक स्वरूपाच्या होत्या. कविता लिहून ती सादर करण्याची कला आत्मसात असणे म्हणजे त्या कविताना जिवंत करण्याचा आत्मा असतो. त्यामुळे कविता लिहणाऱ्याना सादरीकरण कला अवगत असल्यास त्या कवितांचे भाव थेट समोरच्या हृदयाशी भिडतात.
स्पर्धेत अनेक विषयावर उपस्थित कवींनी आपल्या कविता सदर केल्या. यामध्ये पाऊस, शेतकऱ्यांच्या समस्या, पावसाने रुद्र रूप धारण केल्यावर होणारी तारांबळ, पावसाळ्यातील निसर्ग सोंदर्य, पाऊस आणि छत्री, तो आणि तिच्यातला पाऊस अशा अनेक पावसाच्या छटा कवितेत उमटलेल्या होत्या. सौंदर्याने नटलेल्या शब्दसमूहातील कवितांची निवड करणे परीक्षकांना कठीण काम होते. परंतु यामधून प्रथम क्रमांक रेश्मा रविंद्र मेहता, दुसरा क्रमांक दिपाली पवार, तर तिसरा क्रमांक विजय मधुसूदन जोशी यांना मिळाला. यावेळी मार्गदर्शक नमिता दोंदे यांनी सांगितले कि, “हृदयांतर ब्लॉग”ची मूळसंकल्पना सायली परांजपे, प्राजक्त पेंढारकर, हर्षदा शिनकार, अनुजा जाधव यांची आहे. हृदयांतर ब्लॉग कॉम तर्फे नाट्यलेखन कार्यशाळा लवकरच सुरू होणार असेही त्यांनी पुढे सांगितले.