कल्याण-डोंबिवलीत फुटणार 315 दहीहंड्या

डोंबिवली, दि. १४ (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगर परिक्षेत्रात यावर्षीहि दहीहंडी उत्सवाचा उत्साह वाढणार आहे. ठिकठिकाणी खासगी 263 तर 52 ठिकाणी सार्वजनिक अशा एकूण 315 दहीहंड्या विविध गोविंदा पथकांकडून फोडल्या जाणार आहेत.

मंगळवारी मध्यरात्री 12 वाजून 40 मिनिटांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव झाल्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून दहीहंड्यांच्या कार्यक्रमाला प्रारंभ होऊन रात्री 10 पर्यंत सगळ्या हंड्या फोडण्यात येतात. डोंबिवलीत नवसाई, आयरेगावचा राजा, नवयुग, आत्मविश्वास, बाळकृष्ण, माऊली तर कल्याणमध्ये युवा कब्बडी अकादमी गोविंदा पथके हंड्या फोडण्यास सज्ज झाली आहेत. डोंबिवलीमधील नवसाई गॊविंदा पथकाचे प्रशिक्षक कुमार आवटे म्हणाले, आम्ही कोर्टचा मान ठेवतो. मात्र आमचे स्वातंत्र्य हिरावू नका. यापूर्वी आमच्या पथकाने 7 थर लावून हंड्या फोडल्या आहेत. यावेळी आम्ही 8 थरांचा प्रयत्न करणार असल्याचे आवटे यांनी पत्रकारांना सांगितले. आम्ही कामातून वेळ काढून 2 महिने सराव करत असल्याचेही त्यांनी सांगितले. डोंबिवलीतील मनसेच्यावतीने चार रस्ता येथे हंडी लावण्यात येते. सामाजिक संदेश देणाऱ्याही हंड्या देखिल यंदा लक्षवेधी ठरणार आहेत. डोंबिवलीत एकमेव अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव महिला गोविंदा पथकाने ठिकठीकाणी दहीहंड्यांना सलामी देऊन हंड्याही फोडणार आहेत. सालाबादप्रमाणे यंदाही महिला गोविंदा पथकांसाठी नवरे कंपाऊंड तर दीनदयाळ रोडला पुरूष पथकांसाठी दहीहंडी उभारण्यात येणार आहे अशी महिती नगरसेवक शैलेश धात्रक यांनी दिली. तसेच पश्चिमेकडील महात्मा फुले रोडला मथुरा साई दिलासा मंडळाची मथुरा दहीहंडी लावण्यात येते. डोंबिवली पूर्वेतल्या बाजीप्रभू चौकातील भाजपाची लाख मोलाची दहीहंडी देखील लक्षवेधी ठरणार असून या ठिकाणी भव्य स्टेज उभारणीचे काम सुरू आहे.