डोंबिवली, दि. १५ (प्रतिनिधी) : शहरात जोरदार पावसाच्या वर्षावात “स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव” साजरा करण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली. ध्वजरोहणाला सलामी देऊन तरुणाईची पावले पूर्वेकडील बाजीप्रभू चौकाकडे वळली होती. मुख्य म्हणजे शासनाने लादलेल्या विविध निर्बंधांमुळे गोविंदाच्या आनंदावर विरजण पडले होते. तरीही विविध गोविंदा पथकांनी हंड्या फोडून आनंदोत्सव साजरा केला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपा तर्फे बांधलेली “जीएसटी” संकल्पनेवर आधारित “गुड स्मार्ट टाऊन” प्रचाराची दहीहंडी शहरात आकर्षणाचा विषय ठरली. सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले. यावर्षी शहरात कुठेही सेलिब्रेटीनां बोलाविण्यात आले नसल्याने गर्दीचा महापूर दिसला नाही.
आज सकाळी डोंबिवलीत महापौर राजेंद्र देवळेकर आणि पालिका आयुक्त पी. वेलारासू यांनी ध्वजवंदनानंतर शहीद कॅ. विनयकुमार सच्चान स्मृतीस्थळावरील स्मारकाला वंदन केले. तसेच इंदिरा नगर येथेही राष्ट्रीय काँग्रेस पक्षा तर्फे नगरसेविका दर्शना शेलार यांनी ध्वजारोहण केले. तर टंडनरोड येथील चौकात बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी ध्वजारोहण केले त्यावेळी पालिकेचे विरोधी पक्ष नेते मंदार हळबे उपस्थित होते.
प्रतिवर्षाप्रमाणे डोंबिवलीत बाहेरून येणाऱ्या गोविंदा पथकांची गर्दी दिसून येत असे परंतु यावर्षी शहरा बाहेरील पथके फार थोड्या प्रमाणात दिसून आली. दहीहंडी हा साहसाचा खेळ आणि थरावर थर पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी लोटत असे पण त्या प्रमाणात नागरिकही दिसले नाहीत. एकंदरीत दहीहंडी सण पारंपरिक पद्धतीने डोंबिवलीत साजरा झाला. पूर्वेला बाजीप्रभू चौक मधील तुरळक गर्दी सोडली तर बाकी ठिकाणी तशी गर्दी दिसून आली नाही. चार रस्तावरील मनसेच्या दहीहंडीला विविध गोविंदानीं सलामी दिली.
तसेच कोपरगाव येथे परिवहन सभापती संजय पावशे यांनी बांधलेली हंडी फोडायला गोविंदानी हजेरी लावली. ग्रामीण विभागातील आजदेगांव येथील वै.ह.भ.प. बाळाराम कृष्णा पाटील प्रतिष्ठान तर्फे प्रतिवर्षी साजऱ्या आध्यात्मिक दहीहंडीला गोविंदा पथकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी वासुदेव पाटील, एकनाथ पाटील, बुधाजी पाटील, मदन भोईर यांनी विशेष मेहनत घेतली. प्रतिष्ठान तर्फे शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
पश्चिम विभागातील भाजापाच्या धात्रक दांपत्यानीं दीनदयाळ रोडवरील बांधलेल्या हंडी फोडण्यास गोविंदा पथकांनी गर्दी करून हंडी फोडण्यासाठी थरावर थर लावून सलामी दिली. सलामी दिलेल्या गोविंदा पथकांना रोख पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान सकाळी पालिकेच्या डोंबिवलीच्या विभागीय कार्यालयात उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.