डोंबिवली, दि. १६ (प्रतिनिधी) : घरासमोर कचरा टाकण्याच्या वादातून एका महिलेचा शेजाऱ्याने डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून केल्याची घटना घडली. सुनंदा प्रकाश लोकरे (45) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातल्या ओम साई चाळीत राहते. या चाळी समोरच राहणारा रविंद्र जनार्दन मसुरकर (35) या खुन्याला डोंबिवली पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकून गजाआड केले. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घरातून काढलेला कचरा टाकण्यावरून सुनंदा आणि रविंद्र या दोघांत भांडण जुंपले याला कारण म्हणजे कुत्र्याने केलेली घाण (विष्ठा) पाण्यावाटे आली पण ती घरासमोर टाकली त्यमुळे हा वाद शेवटी विकोपाला गेला. त्यामुळे रविंद्र याने घरातील लोखंडी रॉड आणून सुनंदा हिच्या डोक्यात घातला. परिणामी सुनंदा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. हे पाहून हल्लेखोर रविंद्र याने तेथून पळ काढला. शेजाऱ्यांनी जखमी अवस्थेत तिला पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी सुनंदा हिला मृत घोषित केले. त्यानंतर काही तासातच पोलिसांनी फरार रविंद्र मसुरकर याला एका चाळीतून अटक करून गजाआड केले.