डोंबिवलीत भरदिवसा फायनान्स कंपनीची लाखोंची रोकड लुटली

डोंबिवली, दि. १८ (प्रतिनिधी) : शहरात दिवसाढवळ्या एका खासगी फायनान्स कंपनीची लाखोंची रोकड लुटल्याची घटना घडली असून यामध्ये कंपनीचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे वर्दळीच्या ठिकाणी आणि दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील सागाव परिसरात आज दुपारी 4 ते 4.30 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. येथे असणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीची रोकड नेण्यात येत असताना इमारतीखाली दबा धरून बसलेल्या दोघा जणांनी या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. तसेच ही लाखोंची रोकड बाळगणाऱ्या कस्टोडियनला लक्ष करीत त्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्याकडील लाखोंची रक्कम लुटून नेली. आणि शेजारील गल्लीतून पोबारा केला. जखमी झालेल्या या कर्मचाऱ्याला डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ही रक्कम किती होती याचा अधिकृत आकडा समजू शकलेला नसला तरी सुमारे 18 लाखांची रोकड लुटून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत फायनान्स कंपनीच्या स्टाफकडे विचारणा केली असता त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या गुन्हेगारी घटनांमूळे सांस्कृतिक नगरीला गुन्हेगारीचे ग्रहण लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.