डोंबिवली दि. ८ (प्रतिनिधी) : पूर्वेकडील औद्योगिक विभागातील खंबाळपाडा रस्त्यावरील खड्ड्यात पडून मार्बल व्यापारी ललित संघवी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासन अधिकाऱ्यांना सर्वच राजकीय पक्षांनी धारेवर धरले. मात्र राजकीय पक्षांचा रुद्रावतार पाहूनही शासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकत एकमेकांकडे बोटं दाखवून जबाबदारी झटकली. एका निष्पापाचा जीव जाऊनही प्रशासनाला कोणताच फरक पडत नाही हे सिद्ध झाले.
ललितच्या मृत्यूविरोधात आज डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी घरडा सर्कल परिसरात निदर्शनं करीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. एमआयडीसी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात मनसे, भाजप, शिवसेना, आरपीआय पदाधिकारीही सहभागी झाले होते. यावेळी मोर्चातील शिष्टमंडळाने आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसी, कल्याण डोंबिवली महापालिका, पीडब्ल्यूडी आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्डे आणि त्यांच्या दुरुस्तीबाबत जाब विचारला. परंतु त्यावेळी सर्व शासकीय यंत्रणांनी आपापली जबाबदारी झटकत एकमेकांकडे बोटं दाखवली. त्यामूळे संतप्त मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांना खडसावून काम जमत नसेल तर खुर्च्या खाली करा अशी मागणी केली.
यावेळी भाजप नगरसेवक महेश पाटील, मनसे उपाध्यक्ष राजेश कदम, शहराध्यक्ष मनोज घरत, गटनेते प्रकाश भोईर, सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक विश्वनाथ राणे, आरपीआयचे माणिक उघडे आणि व्यापारी सहभागी झाले होते.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया :
ललित संघवीचा मृत्यू होऊन आठवडा उलटला तरी कोणत्याच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नाही. जैन कुटुंबियांना आर्थिक भरपाई मिळावी आणि दोषींवर कारवाई करावी नाहीतर मनसे उग्र आंदोलन छेडणार.
— मनोज घरत, मनसे शहराध्यक्ष
कल्याण डोंबिवली महापालिकेत गावे समाविष्ट केल्यानंतर तेथील रस्ते व इतर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची आहे. याबाबत महापालिकेला औद्योगिक विभागाने तसा पत्रव्यवहार केला आहे.
— सुभाष तुपे, अधीक्षक अभियंता एमआयडीसी
कल्याण डोंबिवली महापालिकेत गावे समाविष्ट करण्यात आली असली तरी शासनाने काही निर्णय अद्याप घेतले नाहीत. अनेक बाबी अद्याप त्यांनी पालिकेकडे हस्तांतरीत केलेले नाहीत. पालिका आयुक्तांनी त्यांना सदर रस्ते सुस्थितीत करून मग हस्तांतरीत करण्यास सांगितले आहे.
— राजेश मोरे, पालिका सभागृह नेते