चार स्थानकांना जोडणाऱ्या नव्या मार्गावर धावली परिवहनची बस

डोंबिवली, दि. १३ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रम नेहमीच तोट्यात चालतात. काही धोड्याच मार्गामुळे परिवहन फायद्यात जाते अशी नेहमीची वक्तव्य परिवहनच्या बाबतीत बोलली जातात. पण यावर उपाय म्हणून परिवहन सभापती संजय पावशे यांनी नवी योजना आखून एका वेगळ्याच अनोख्या मार्गावर बस सेवा दिली आहे. रेल्वे स्थानकांवर बसची मागणी प्रवासी नेहमी करीत असतात. याच गोष्टीचे योग्य भान राखून कोपर ते गणेशघाट मार्गावरून धावणारी बसला आज प्रारंभ झाला. या मार्गामुळे बस चार स्थानकांशी जोडली जाणार आहे. अशा या मार्गामुळे बसला प्रवासी आणि प्रवाश्यांना बस अशी सुविधा होणार आहे. विशेष म्हणजे आज संजय पावशे यांचा वाढदिवस होता याचे औचित्य साधल्याने कोपरच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

कोपर स्थानाकात भिवंडी, पनवेल आणि वसई या पट्ट्यातील प्रवासी येतात. ग्रामीण विभागातील काही शेतकरी भाजीपाला घेवूनही डोंबिवलीत येतात. अशा या प्रवाश्यांना कोपर स्थानकातून रिक्षा मिळत नाही अशा तक्रारी पावशे यांच्याकडे येत होत्या. डोंबिवली पश्चिम विभागातून कल्याणला जाणारी बस सेवा नव्हती. या गोष्टीची दाखल घेवून आणि कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण या चारही रेल्वे स्थानकांतील प्रवाशांना बस सुविधा मिळणारा मार्ग म्हणून कोपर ते गणेशघाट (कल्याण) या मार्गावर धावणारी सेवा प्रवाश्यांना बहाल केली. विशेष म्हणजे डहाणू शटल वेळापत्रकानुसार बस धावणार असून पाच फेऱ्या होणार आहेत. त्याचबरोबर कोपर ते पनवेल आणि कोपर ते वाशी या मार्गावरही बस काही दिवसत सुरु होईल असेही पावशे यांनी सांगितले. आज सकाळी अकरा वाजता कोपर स्थानकावरून बस सोडण्यात आली त्या उद्घाटन कार्यक्रमात पावशे बोलत होते. यावेळी वाहतून निरीक्षक श्याम पष्टे, तानाजी मुदृक, देसाईमामा, महिला शाखा प्रमुख प्रीती देसाई, शुभाष गायकवाड, आत्माराम शिंदे, रवींद्र राणे, अनंत मिंडे आदी उपस्थित होते.