सामान जप्तीच्या कारवाई विरोधात फेरीवाल्यांचे ठिय्या आंदोलन

डोंबिवली : फेरिवाल्यांच्या विरोधात पालिकेच्या डोंबिवली विभागाने कडक कारवाई सुरु केली आहे. गेले दोन महिने या फेरीवाल्याना स्टेशन परिसरात बसु दिले जात नाही. यामुळे संतापलेल्या फेरीवाल्यांनी गुरुवारी सायंकाळी आक्रमक पवित्रा घेतला. सामान जप्तीसाठी आलेल्या पालिकेच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन केले. परंतु पालिकेने जप्त केलेले सामान परत न देता डोंबिवली पालिका विभागीय कार्यालय आणले असता काही फेरिवाल्यानी पालिकेच्या कार्यालयात धाव घेतली. परंतु सुरक्षा रक्षकांनी मुख्य प्रवेशद्वार बंद करुन फेरिवाल्याना मज्जाव केला.

येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी फेरीवाल्याच्या विरोधातील कारवाईस मज्जाव करत असल्याने बुधवारी त्यांच्यावर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारीही त्यांनी या फेरीवाल्यांची पाठराखण केली. महापौर विनिता राणे यांनी गेल्या आठवड्यात डोंबिवली पुर्व भागात लागोपाठ तीन दिवस दौरा करुन फेरिवाल्यावरील कारवाईबाबत पालिका अधिकऱ्यांना सूचना दिल्या आहेत. महापौरांच्या आदेशाचे पालिका अधिकारी व कर्मचारी तंतोतत पालन करून झटत आहेत.

गेल्या दोन दिवसापासून राष्टवादीच्या कार्यकर्तानी या फेरीवाल्यांची बाजू घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांची काँलर पकडणे, त्यांना शिवीगाळ करण्याचे प्रकार करत असल्याची तक्रार पालिका कर्मचारी करत असल्याचे समोर येत आहे. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून हा आरोप खोटा असल्याचे सांगितले जात आहे. माझ्या गैर वागणुकी विरोधात मंगळवारी रामनगर पोलिसात तक्रार केली आहे व मी बुधवारी कारवाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची कॉलर पकडल्याची कागाळी केली जाते. हा विरोधाभास आहे असे राष्टवादीचे डोंबिवली कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर यांचे म्हणणे आहे. परतू असे आसले तरी येथील फेरीवाले आक्रमक झाले असून कायदा सुव्यवस्था टिकविण्याची जबादारी आता पालिकेच्या सुरक्षा रक्षकांवर आहे.