मुजोर रिक्षा चालकांमुळे शाळांच्या चौकात होते वाहतूक कोंडी [ वाहतूक कोंडीने संपूर्ण शहर त्रस्त ]

डोंबिवली : शहरात रिक्षा चालकांच्या अनागोंदी कारभारामुळे रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी होते ही नित्याचीच बाब आहे. आता ही समस्या शहरातील शाळांच्या चौकाचौकात होत असल्याने संपूर्ण शहर वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना आता जा-ये कशाप्रकारे करावी हेच उमजत नाही. वाहतूक नियंत्रण पोलिसांचा धाक येथील रिक्षा चालकांवर नसल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येकडे कोण लक्ष देणार अशी विचारणा होत आहे.

पूर्व-पश्चिम शहराचा विचार केला तर शहरात पूर्वेकडे जोशी हायस्कूल, के.बी. वीर हायस्कूल, पाटकर स्कूल, आदर्श विद्यालय, मंजुनाथ, राधाबई साठे, पांडुरंग विद्यालय, डी.एन.सी. हायस्कूल तर पश्चिमकडे जोंधळे विद्यालय, स्वामी विवेकानंद स्कूल, महात्मा गांधी विद्यालय, सेंट मेरी स्कूल या सर्व शाळा मोक्याची ठिकाणी असल्याने नेहमी रहदारी असते. संबंधित शाळेतील काही विद्यार्थी रिक्षाने शाळेत येत असतात. रिक्षा चालकांना कोणत्याच नियमांची दखल घेता येत नसल्याने यावेळी वाहतूक कोंडी होते. त्याचप्रमाणे रिकामी जागा हाच  रिक्षा थांबा असा रिक्षा चालकांचा स्वतःचा नियम असल्याने सामान्य नागरिकाला काहीच बोलता येत नाही. परिणामी शाळा भरतांना आणि सोडतांना वाहतूक कोंडीमुळे समस्या निर्माण होते.

वाहतूक नियंत्रण पोलिसांनी ही बाब दुर्लक्षित ठेवल्याने दिवसेंदिवस दररोज वाहतूक कोंडी होत आहे. पूर्वी याच  शाळांच्या चौकाचौकात वाहतूक नियंत्रण पोलीस कार्यरत होते. बाजारात समान खरेदीसाठी जा-ये करणाऱ्या महिला तसेच जेष्ठ नागरिकांना त्रास होत असून अनेक तक्रारी वाहतूक नियंत्रण पोलिसांकडे दिल्या जात आहेत. वाहतूक कोंडी मोकळी करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी निशिकांत मोडक यांनी केली आहे. याबाबत रिक्षा लाल बावटा रिक्षा युनियनचे नेते काळू कोमास्कर यांना विचारले असता त्यांनी सांगितले  कि, आम्ही युनियन तर्फे या विषयाचे फलक लावू आणि रिक्षा चालकांना याबाबत पत्रक काढून समज देऊ. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( वाहतूक शाखा ) सतीश जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले कि, वाहतूक कोंडी होते ती नियंत्रणात आणण्यात येईल परंतु पोलीस बळ कमी असल्याने काही वेळा अशी परिस्थिती होते. परंतु आम्ही नियम तोडणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करतो.