डोंबिवली : नैराश्य आलं कि आत्महत्या अशी एकूण मानसिकता दिसून येते. अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या जागतिक सर्वेक्षणात अनेक देशातील आत्महत्या करणाऱ्या 1 लाख 30 हजार लोकांच्या पूर्वआयुष्याची माहिती घेतली. त्या सर्वेक्षणात एकही खेळाडूने आत्महत्या केली नसल्याचेही समोर आले आहे. कारण खेळाडूला कधीही नैराश्य येत नाही. पराभव पचवण्याची त्याच्यात ताकत असते. म्हणून प्रत्येकाने खेळले पाहिजे, त्यामुळे त्याच्यात खेळाडू वृत्ती येते असे मत भाभा अणुशक्ती अनुसंशोधन केंद्राचे माजी अधिकारी रामप्रकाश नायर यांनी डोंबिवलीत सांगितले.
कोपर रोड येथील सुदाम कान्हा म्हात्रे मैदानात गावदेवी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या मर्यादित अ़ंडर आर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात पिंट्या दादा संघाने वेदांत संघावर मात करित नामदेव स्मृती चषक सहज पदरात पाडला. विजेता पिंट्या दादा संघास 1 लाख 11 हजार 111 रुपये रोख पारितोषिक आणि नामदेव स्मृती चषक देण्यात आला. तर उपविजेता वेदांत संघास 55 हजार 555 रुपये रोख पारितोषिक आणि चषक देण्यात आले. यावेळी क्रिकेट सामन्याचे आयोजक माजी स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे, भाभा अणुशक्ती अनुसंशोधन केंद्राचे माजी अधिकारी रामप्रकाश नायर, शिवसेना उपतालुका प्रमुख एकनाथ पाटील, शिवसेना महिला आघाडी प्रमुख कविता गावंड, नगरसेवक जयवंत भोईर, प्रगती महाविद्यालयाच्या उपप्राचार्य किशोरी भगत, मनोज म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, अनंत म्हात्रे, पांडुरंग म्हात्रे, शिक्षक सेनेचे जगदीश भगत, डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष श़ंकर जाधव, रिपाईचे माणिक उघडे उपस्थित होते.
यावेळी वेदांत 11 चा सागर या खेळाडूस मालिकावीर म्हणून घोषीत करण्यात आले. तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून पिंट्या दादा संघाचा राहुल याला विशेष पुरस्कार दिला. गोलंदाज म्हणून सुपर 8 संघाचा खेळाडू मयूर उत्कृष्ट गोलंदाज ठरला. सामनावीर म्हणून पिंट्यादादा संघाचा ऋत्विक यास आकर्षक पॅशन बाईक देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले, 40 पेक्षा जास्त वयाच्या खेळाडूंसाठी एक सामना ठेवण्यात आला होता. या वयात आरोग्य चांगले राहावे म्हणून खेळले पाहिजे असा यामागचा उद्देश होता.