डोंबिवली : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे डोंबिवली शाखेच्या माध्यमातून 45 वे महानगर मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी डोंबिवली पूर्वेतील माऊली सभागृहात होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक डॉ. राजन गवस, स्वागताध्यक्ष माधव जोशी असून संमेलनाचे उद्घाटन स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माधव जोशी, धनश्री साने, गीता नवरे, वृंदा कौजलगीकर, दिपाली काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी देशपांडे यांनी सांगितले कि, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती जतन, संवर्धन आणि विकास करणे ही संस्थेची उद्दिष्टे आहेत. नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन, नवनवीन वक्त्यांना व्यासपीठ आणि मान्यवर साहित्यिकांच्या गाठीभेठी यामुळे नवोदित लेखकांना मार्गदर्शनासाठी कार्यक्रम घेतले जातात.
डोंबिवली शहरात अशा प्रकारच्या डोंबिवली शाखेच्या माध्यमातून होणाऱ्या पहिल्याच संमेलनात बदलती सामाजिक मूल्ये या विषयावर परिसंवाद होणार असून लेखिका राणी दुर्वे, अवधूत परळकर, अक्षय शिंपी, मृणालिनी चितळे सहभागी होणार असून अध्यक्ष म्हणून मिलिंद जोशी धुरा वाहणार आहेत. “नाते शब्द सुरांचे” या चर्चा परिसंवादात सुप्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी, सुलभा पिशवीकर सहभगी होत असून त्याचे संगीत समीक्षत मुकुंद संगोराम आहेत.
यावेळी संस्थेतर्फे काव्य रसिक मंडळाचे संस्थापक मुकुंद देशपांडे, डोंबिवलीकर मासिकाचे संपादक रवींद्र चव्हाण, कार्यकारी संपादक प्रभू कापसे, ईशान्य वार्ताचे संपादक पुरुषोत्तम रानडे, गुलाब वझे यांचे सत्कार करण्यात येणार आहेत. तसेच ग्रंथप्रसारक कै. शरद जोशी स्मृती ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून संमेलनाच्या व्यासपीठास कै. प्रभाकर अत्रे व्यासपीठ नांव देण्यात येणार आहे. या संमेलनास पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि सोलापूर येथून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.