महापौर विनिता राणे यांच्या घरासह तेलकोसवाडीत बत्ती गुल [ पश्चिम डोंबिवलीत चार तास वीज खंडित ]

डोंबिवली : पूर्वी महाराष्ट्र वीज वितरण महामंडळाच्या भारनियमन कारभारामुळे तासंतास बत्ती गुल होण्याच्या घटनांना वीज ग्राहकांना सामोरे जावे लागत होते. परंतु डोंबिवलीतील वीज ग्राहकांच्या शंभर टक्के विद्युतदेयके भरणा करण्यामुळे येथील वीजग्राहकांची सुटका झाली आणि डोंबिवलीकरांना 24 तास वीज उपलब्ध होत आहे. परंतु आता वीज वितरण मंडळाच्या डोळेझाक कामामुळे बत्ती गुल होत असून विजेची बिले प्रामाणिक भरणाऱ्या ग्राहकांना अंधारात चाचपडावे लागत आहे. विशेष म्हणजे कडोंमपा महापौर विनिता राणे यांच्या प्रभागातील  हेवीवेट केबल फॉल्टमुळे पश्चिम डोंबिवलीत अंधाराचे साम्राज्य झाले.

मंगळवारी पश्चिम डोंबिवलीतील देवीचौक येथील 300 केव्ही केबल कामासाठी वीज वितरण मंडळाने सकाळी 10:30 ते दुपारी 4:30 पर्यंत वीजप्रवाह बंद ठेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. दरम्यान सायंकाळी 5:00 वाजता वीज पूर्ववत सुरु झाली होती. परंतु रात्री 8:00 वाजत अचानक हेवीवेट केबलमधील फॉल्टमुळे संपूर्ण शास्त्रीनगर येथील वीजप्रवाह खंडित झाला. जुनी डोंबिवली नेमाडेगल्लीतील ट्रान्सफॉर्मरजवळील हेवीवेट केबलमध्ये बिघाड झाल्यामुळे बत्तीगुल झाल्याचे निश्चित झाल्यानंतर मंडळाचे कर्मचारी कामाला लगले. परंतु या घटनेमुळे परिसरातील 32 ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने याचा फटका 25 हजार वीजग्राहकांना बसला. डोंबिवलीतील चाकरमान्यांनी घर गाठूनही त्यांना अंधारातच चाचपडावे लागले. तर दुकानदारांनाही अंधारात मेणबत्यांच्या आधारात काम करावे लागेल. दिवसभर वीज बंद असल्याने त्यांच्याकडील इनव्हर्टस पॉवर पर्यायही नव्हता. दरम्यान चार तासांच्या अथक प्रयत्नाने काही विभागात वीज पूर्ववत सुरु झाली. परंतु तेलकोस वाडीतील हेवी केबल्स खराब झाल्यामुळे तेथील वीज सुरु करण्यास वीज वितरण मंडळ असहाय्य ठरल्याने महापौर विनिता राणे यांच्यासह तेधील वीज ग्राहकांना अंधारातच रात्र घालवावी लागली. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बुधवारी हेवीवेट केबल बदलल्यानंतर वीज प्रवाह सुरळीत होईल असे सांगण्यात आले.