जेष्ठ पत्रकार महेंद्रभाई ठक्कर यांचे निधन

डोंबिवली : डोंबिवली पत्रकार संघांचे सदस्य तथा दै. प्रजाराजचे वार्ताहर महेंद्रभाई ठक्कर यांचे मंगळवारी रात्री वार्धक्यामुळे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. बुधवारी सकाळी शिवमंदिर रोड जवळील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील त्यांचे अनेक जेष्ठ मित्र परिवार व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महेंद्रभाई ठक्कर यांनी मुंबई समाचार, जन्मभूमी या दैनिकांमधून लिखाण केले आहे. ते वयाच्या 78 वर्षीही प्रजाराज दैनिकाच्या माध्यमातून पत्रकारिता करीत होते. अतिशय शांत आणि मृदू स्वभावी म्हणून त्यांची शहरात ओळख होती. ते कच्छी जैन समाजासाठी काम करीत होते. लहानपणापासून त्यांनी संघ स्वयंसेवक म्हणून केलेले काम शेवटच्या घटकेपर्यंत सुरु होते. डोंबिवली पत्रकार संघाच्या स्थापनेपासून ते कार्यरत राहून संघाची त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि चार मुले तसेच भाऊ, बहिण, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.