डोंबिवली : एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या पदवी, पदवीका, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या /वर्षाच्या नियमित, एटीकेटी व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षा १ ते २३ ऑक्टोबर दरम्यान एम के सी एल कंपनीच्या साहाय्याने शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. एकूण ४२९ प्रकारच्या परीक्षांमध्ये ३२ हजार ८५० विद्यार्थिनींनी परीक्षा दिली.
महिला विद्यापीठाचा विस्त्तार महाराष्ट्र,गोवा, गुजरात, दिल्ली, बिहार, मध्यप्रदेश तसेच आसाम इत्यादी राज्यांमध्ये झालेला असून तेथील विद्यार्थिनींना विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या विविध महाविद्यालयांमार्फत व्यवसायीक शिक्षण देण्यात येते. अनेक विद्यार्थिनी शहरी तसेच दुर्गम, आदिवासी भागात राहणाऱ्या असल्यामुळे ऑनलाइन परीक्षेत नेटवर्कची समस्या येत होती. परीक्षेपूर्वी विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयामध्ये विद्यर्थिनिंच्या समस्या सोडवण्यासाठी समुपदेशन केंद्र निर्माण करण्यात आले होते. प्रत्येक महाविद्यालया कडून विद्यार्थिनींच्या परीक्षेत संदर्भातील अडचणी व व्यक्तिगत समस्या निकाली काढण्यात आल्या.
कोरोनाच्या प्रभावामुळे सर्वच पातळ्यांवर विविध प्रकारे निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवून विद्यापीठ कार्य करीत होते. यामध्ये परीक्षेपूर्वी विद्यार्थिनींसाठी मॉक टेस्ट देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. परीक्षा घेण्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करणे हे एक आव्हानात्मक काम होते महाविद्यालयांतील प्रध्यांकांना, एम.के.सी.एल व एस.एन.डी.टी. संचालित यु. एम. आय. टी. मधील इंजिनिअरिंगच्या प्राध्यापकांनी केलेल्या तांत्रिक सहाय्य व सहकार्यामुळे प्रश्नपत्रिका संच वेळेत पोर्टलवर अपलोड करणे शक्य झाले.
दिव्यांग विद्यार्थिनींना परीक्षेसाठी वीस मिनिटे वेळ जास्त देण्यात आला होता तसेच काही विद्यार्थिनींना रायटरची आवश्यकता भासल्यास त्यासाठीही तात्काळ मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर ज्या विद्यार्थिनी परीक्षेला बसू शकल्या नाहीत अश्या विद्यार्थिनींच्या अडचणी सोडवून त्यांच्यासाठी २२ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान पुनर्परीक्षेचे आयोजनही करण्यात आले होते. सर्व स्तरावर कोणतीही विद्यार्थिनी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी विद्यापीठामार्फत घेण्यात आली. नुकत्याच झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय. प्रो. शशिकला वंजारी यांनी परीक्षेच्या कामात उल्लेखनीय काम करणारे प्र. कुलगुरू डॉ विष्णु मगरे, विविध विद्याशाखांच्या अधिष्ठाता, व परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक यांचे कौतुक केल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ सुभाष वाघमारे यांनी सांगितले . कुलगुरू मा.प्रो. शशिकला वंजारी पुढे म्हणाल्या की, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळातील सर्व सदस्य, विद्यापीठ व संचालित महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, पालक व संस्थापक याचेही मोलाचे सहकार्य मिळाले या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
