लहान मुलांच्या ऑनलाईन शिक्षणामुळे डोळ्यांच्या आजारात वाढ (नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा हेरूर यांचे प्रतिपादन)

डोंबिवली : शाळेतील शिक्षण बंद झाले असून विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थी चार-चार तास मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेत असल्याने त्यांना डोळ्यांच्या समस्या त्रासदायक ठरत आहेत. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांचे आजार वाढत आहेत असे प्रतिपादन नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा हेरूर यांनी केले.

शहरातील प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा हेरूर यांनी सध्याची कोविड परिस्थिती आणि म्युकर मायक्रोसीस या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी याविषयावर भाष्य केले.

सध्या कोविड काळात सर्वच परिस्थिती बदलली आहे. कोविड नियंत्रणात यावा म्हणून शासन-प्रशासनाने कठोर निर्णय घेऊन वर्क-फॉम्-होम व ऑनलाईन शिक्षण सुरू केले. परंतु याचा परिणाम म्हणून डोळ्यांच्या आजारात वाढ झाली आहे. सध्या म्युकर मायकोसीस हा रोग जोर धरत असून त्यावर नियंत्रण मिळावे याकरता डोळ्यांची तपासणी तात्काळ करून घेणे हिताचे आहे असे त्यांनी सांगितले.

आजकाल काम आणि खेळ दोन्हीसाठी एकच तंत्रज्ञान वापरलं जातं. खेळ असो वा काम समोर एक स्क्रीन असतेच. मग ती मोबाईलची असो, कॉम्प्युटरची किंवा लॅपटॉप, टॅबलेट ची. या स्क्रीन वर खूप काळ सातत्याने बघत राहिल्याने डोळ्यांचे विकार बळावतात. स्क्रीनवर एकटक बघत राहिल्याने डोळ्यांची उघडझाप कमी होवून डोळ्यांवर ताण निर्माण होतो. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा, ताण येणे, डोळे जडावणे, डोकेदुखी असे त्रास होतात. जर ही सवय सोडली नाही तर आपल्याला अनेक त्रासांला सामोरे जावे लागेल.

जर डिजिटल साधने वापरायची असतील तर कमीत कमी एक तासामध्ये तीन वेळा 20 सेकंदाच्या ब्रेक घेणे आवश्यक आहे. याबरोबर बैठे काम करतांना बसण्याच्या पध्दतीवर लक्ष ठेवले पाहिजे. सध्या लाइफस्टाइल बदलल्याने कमी वयातही मोतीबिंदूचे रुग्ण दिसून येतात.
म्युकर मायकोसीस प्रकारात प्रथम नाकावाटे विषाणूचा शिरकाव होतो त्यामुळे वेळीच जागरूक राहिले पाहिजे. नाक, डोळे आणि मेंदुवर याचा परिणाम होतो. डोळे सुजणे, नाकातून घाण वास येणे, डोळ्यांची बाजू दुखणे, डोळा पुढे येणे अशी लक्षणे दिसून येतात.
यासाठी जनजागृती करणे खुप महत्वाचे असून यासाठी आमची तयारी आहे. यासाठी आमच्याकडून शाळांना तसेच शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार केला गेला पण त्याकडे दुर्लक्ष झाले याचे आश्चर्य वाटते असेही त्यांनी सांगितले.