डोंबिवली : खड्डे आणि रस्ता हे समीकरण अनेक वर्षे शहरातील लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे. शहरात काही कॉंक्रीट रस्ते झाले आहेत ते सोडले तर इतर रस्त्यात खड्डेच दिसतात. खड्ड्यांमुळे रस्त्याची दयनीय परिस्थिती झाली आहे. निवासी विभागातले रस्ते महाभयंकर झाले आहेत. रस्त्यातील खड्ड्यांमुळे मागेही पाच जणांचा बळी गेला होता तरीही रस्ते सुधारणा होत नाही. त्यावेळीही आंदोलने झाली आणि त्याच धर्तीवर सत्ताधारी आणि प्रशासन यांचे डोळे उघडावे म्हणून स्वखर्चाने जे खड्डे आहेत ते भरण्यासाठी लोक रस्त्यावर आली आहेत असे प्रतिपादन मनसे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी केले.
मनसे आणि सामाजिक संस्था तर्फे खड्डे भरो आंदोलन गुरुवारी औद्योगिक विभागात करण्यात आले त्यावेळी घरत बोलत होते.
या खड्डा भरो आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर, जिल्हा सचिव प्रकाश माने, जिल्हा उपाध्यक्ष सुदेश चुडनाईक, माजी नगरसेविका सरोज भोईर, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा दिपीका पेडणेकर, महिला सेनेच्या उपशहर अध्यक्षा सपना पाटील, मनसे डोंबिवली शहराचे सचिव अरुण जांभळे, सुभाष कदम, शहर संघटक योगेश पाटील यांच्यासह असंख्य मनसैनिक सहभागी झाले होते.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे आणि अंगीकृत संघटनांचे महिला पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने स्वखर्चाने श्रमदान करून डोंबिवली शहरातील रस्त्यामध्ये पडलेले खड्डे प्रातिनिधिक स्वरूपात एमआयडीसीमधील शिवाई बालक मंदिर शाळेजवळ असलेल्या मुख्य रस्त्यावरील पडलेले खड्डे वेटमिक्स टाकून रोलरच्या साह्याने सपाटीकरण करून भरण्यात आले.
यावेळी घरत म्हणाले की, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फक्त बॅनरबाजी करीत आहेत. या विभागाचे खासदार म्हणून सात वर्षे कार्यरत आहेत. सात वर्षानंतर आता 110 कोटी रस्त्यांसाठी निधी आणला अशी जाहिरात करीत आहेत. पण औद्योगिक विभागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डे आणि रस्ता हे समीकरण अनेक वर्षे शहरातील लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे. शहरात काही कॉंक्रीट रस्ते झाले आहेत ते सोडले तर इतर रस्त्यात खड्डेच दिसतात. खड्ड्यांमुळे रस्त्याची दयनीय परिस्थिती झाली आहे. निवासी विभागातले रस्ते महाभयंकर झाले आहेत. रस्त्यातील खड्ड्यांमुळे मागेही पाच जणांचा बळी गेला होता तरीही रस्ते सुधारणा होत नाही. त्यावेळीही आंदोलने झाली आणि त्याच धर्तीवर सत्ताधारी आणि प्रशासन यांचे डोळे उघडावे म्हणून स्वखर्चाने जे खड्डे आहेत ते भरण्यासाठी लोक रस्त्यावर आली आहेत. खरं तर प्रशासनाने हे काम केले पाहिजे ते काम आम्ही करीत आहोत.
एकशे दहा करोड येणार तेव्हा येणार पण आधी काहीतरी केलं पाहिजे अशी टीका मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी केली. खड्डे पडलेले आहेत त्याची जाणीव करून देण्यासाठी प्रतीकात्मक खड्डे भरण्याचं काम केलं असेही घरत यांनी सांगितले.