महापालिकेच्या संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडासंकुलात संत सावळाराम महाराज म्हात्रे स्मारक उभारा ( पालिका आयुक्तांकडे आगरी युथ फोरमची मागणी )

डोंबिवली : कल्याण डोंबिबली महापालिका अंतर्गत असणाऱ्या डोंबिबली पूर्वेतील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडासंकुलात सदगुरु संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे यथोचित स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी आगरी युथ फोरम आणि अखिल भारतीय आगरी महोत्सव माध्यमातून अध्यक्ष गुलाब वझे यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना केली आहे.

आगरी युथ फोरम आणि अखिल भारतीय आगरी महोत्सव माध्यमातून अध्यक्ष गुलाब वझे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संत सावळाराम महाराज म्हात्रे यांनी किर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात समाजप्रबोधनाचे अनमोल कार्य केलेले आहे. ठाणे, रायगड जिल्ह्यामधे तर वारकरी संप्रदयाचे माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व अध्यात्मिक
क्षेत्रात सदविचारांची धवलक्रांतीच घडवून आणलेली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या डोंबिवली मधील क्रिडा संकुलाला महानगरपालीकेने एकमुखाने संत सावळाराम महाराज यांचे नाव देऊन महाराजांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.

सुदृढ, सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी संत सावळाराम महाराजांचे जीवनकार्य हे समाजाला विशेषत: तरुणाईला आजही प्रेरणादायी ठरत आहे. म्हणूनच समाजाच्या नवनिर्मितीसाठी क्रिडासंकुंलामधे महाराजांचे स्मारक उभारण्यात यावे. ज्यामधे संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचा पूर्णाकृतीपुतळा असावा व महाराजांचे जीवनकार्य हे संगमरवरी दगडावर कोरीव स्वरुपात असावं. त्याबरोबरच त्याठिकाणी संतसाहित्याची उपलब्धताही असावी. अशा प्रकारे उभारण्यांत आलेले स्मारक हे समाजाला सदविचारांनी संन्मार्गाची दिशा देणारे प्रेरणादायी असे स्मारक ठरेल यात शंका नाही. हे स्मारक उभारणीबाबत विस्तृत चर्चा करण्यासाठी आपली वेळही मिळावी असेही नमूद केले आहे.