पुस्तक आदान-प्रदानचा सोहळ्यासाठी माजी केंद्रीय लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन डोंबिवलीत

( दोन लाख पुस्तकांचे होणार आदान प्रदान )

डोंबिवली : पै फ्रेंड्स लायब्ररीच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्यासाठी माजी केंद्रीय लोकसभा स्पीकर सुमित्राताई महाजन उपस्थित राहणार आहेत. सर्व परिसराला ए पी जे अब्दुल कलाम नगरी असे नाव देण्यात येणार असून पुस्तकांनी त्यांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण, महापालिका सिटी इंजिनियर रोहिणी लोकरे, विंदा भुस्कुटे, दीपाली काळे, दर्शना सामंत, धनश्री साने, ललिता छेडा, प्रवीण दुधे, प्रभू कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.

या आदान-प्रदान सोहळ्याच्या शुभारंभाला प्रख्यात साहित्यिक अच्युत गोडबोले, उमाताई कुलकर्णी, राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर, कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रमोद (राजू ) पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते २० जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता उद्घाटन होणार आहे. सर्व परिसराला यंदा ए पी जे अब्दुल कलाम नगरी असे नाव देण्यात येणार असून पुस्तकांनी त्यांची प्रतिकृती साकारण्यात येणार असून ते एक प्रमुख आकर्षण असणार आहे. त्यासोबतच पुस्तकाचे इग्लु, पिरॅमिड आणि अन्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

दरम्यान दहा दिवसांत माजी केंद्रीय लोकसभा स्पीकर सुमित्राताई महाजन, महेश कोठारे, प्रणव सखदेव, अरुणा ढेरे, प्रल्हाद दादा पै, वसंत लिमये, चंद्रशेखर टिळक, रोहन चंपानेरकर, श्रीकांत बोजेवार, अतुल कुलकर्णी, अशोक कोठावळे, सुदेश हिंगलासपुरकर, दिनकर गांगल, कुमार केतकर, अरुण शेवते, अक्षय बर्दापूरकर, कमलेश सुतार, प्रसाद मिराजदार , प्रभू कापसे, वैद्य परीक्षित शेवडे यांच्यासह अनेक लेखक, साहित्यिक, प्रकाशक व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमात कल्याण डोंबिवली महापालिका सहभागी झाली आहे. वाचन संस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने महापालिका सढळ हस्ते सहकार्य करणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोहळ्याला भरीव अर्थ सहाय्य केले असून कल्याण डोंबिवली महापालिका आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार हे या उपक्रमाचे सहआयोजक असल्याचे मुख्य आयोजक पुंडलिक पै यांनी सांगितले.

राष्ट्रपती महामहीम द्रौपदीजी मुर्मू मॅडम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. शहरातील सुमारे ४० साहित्यिक मंडळी या उपक्रमात सहभागी असून त्यांचे सर्व साहित्य यावेळी प्रदर्शनाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे.

यानिमित्त फ्रेंड्स लायब्ररी एक कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरण करणार असून त्यात जवळपास ७५ मान्यवरांचे लेख आहेत, आझादी के ७५ साल या थीमवर आधारित ते पुस्तक प्रसिद्ध होणार असून त्याचे अनावरण शुभारंभाच्या दिवशी होणार आहे. शहरातील ३० हून अधिक शाळा त्यांच्या माध्यमातून १५ ते १९ जानेवारी दरम्यान ग्रंथ दिंडी काढणार आहेत. त्यात सुमारे १५ हजार विद्यार्थी सहभागी होतील. तसेच पै फ्रेंड्स लायब्ररी आणि आयोजकांच्या माध्यमातून १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौकातून मानपाडा चार रस्ता टिळक चौक सर्वेश हॉल फडके पथ गणेश मंदिर या मार्गावर ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे