( वृद्धाश्रमात होतात सण- उत्सव )
डोंबिवली : पश्चिमेकडील कुंभारखानपाडा येथे साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात प्रतिवर्षाप्रमाणे संस्थापक अध्यक्षा सुमेधा थत्ते यांच्या माध्यमातून नवरात्रोत्सव निमित्ताने नवचंडी याग आणि कुंकुमार्चन सेवा श्रीसुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील महिलांनी यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाव घेतला. सामाजिक बांधिलकी म्हणून सुमेधा थत्ते यांचे कार्य सर्वपरिचित असून विविध क्षेत्रातील महिला थत्ते यांच्या
आधार वृद्ध सेवा केंद्रातशी जोडल्या गेल्या आहेत.
गुरुवारी ललिता पंचमीचे औचित्य साधत नवचंडी याग आणि कुंकुमार्चन सेवा श्रीसुक्त हा धार्मिक कार्यक्रम वृध्द सेवा केंद्रात झाला. यानंतर महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम झाला. यावेळी सुमेधा थत्ते, सुदिशा पगारे, योगिताताई पाटील मंदाताई पाटील कोमल पाटील, स्मिताताई भणगे, श्रद्धा किरवे, नीलिमा भोईर, मनाली पेडणेकर यांच्यासह इतर महिला वर्गांनी हळदीकुंकू आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

साधना वृद्ध सेवा केंद्रात दरवर्षी प्रत्येक सण- उत्सव साजरा करताना वृद्ध आपले दुःख, अडचण विसरून जातात. वृद्धाश्रम म्हणजे एक कुटुंब म्हणून आम्ही आजी-आजोबांसाठी दहीहंडी उत्सव, तुलसीविवाह, गणेशोत्सव, रक्षाबंधन, दिवाळी, होळी, रंगपंचमी असे अनेक सण साजरे करतो. नवचंडी ही एक दुर्गा पूजा आहे जी इच्छा पूर्ण करण्यासाठी केली जाते. नवचंडी यज्ञ केल्याने उपासकाला दुःखांपासून मुक्ती मिळते अशी आमची भावना आहे असे सुमेधा थत्ते यांनी सांगितले.