राजकीय सवाल-जबाबातही पलावा उड्डाणपूल फास्ट

( पलावा चौकात वाहतूककोंडीला मोकळीक )डोंबिवली : ठाणे, मुंबई, नवीमुंबई गाठण्यासाठी महामार्ग असलेल्या कल्याण शीळ रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे जनता हैराण झाली होती. यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडीतून सोडवणूक होण्यासाठी पलावा येथे नवीन उड्डाणपुलाची निर्मिती झाली. नुकताच शिवसेना (शिंदे गटाने) या पुलाचे लोकार्पण घाईघाईत केले. मात्र ताबडतोब काही कारणामुळे काही काळासाठी प्रशासनाने तो पूल बंद केला. यामुळे मनसे व शिवसेना (उद्धव) या विरोधकांनी प्रक्रियेवर सवाल उपस्थित केले, प्रत्यक्ष जाऊन पाहणीही केली. त्यावरून दोघांनीही सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाला कठघऱ्यात खेचले. मात्र असे असले तरी लोकांसाठी ताबडतोब उड्डाणपूल सुरू व्हावा ही इच्छा सत्ताधाऱ्यांची असल्याने पुलाचे लोकार्पण झाले. आता या उड्डाणपुलाबाबत राजकीय सवाल-जबाब होत असले तरी पलावा उड्डाणपूलामुळे काही प्रमाणात वाहतूककोंडीतून मोकळीक मिळाल्याचे लोकं सांगत आहेत.

या उड्डाणपुलाच्या विकास कामावर टीका करतांना शिवसेना (उद्धव गट) कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, अर्धवट पुलाचे उद्घाटन झालं, पुलावरून प्रवास करतांना अनेक जण पडून जखमी झाले. आता तर त्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यामुळेच पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना निवेदन दिले आहे. ज्या लोकांनी अर्धवट पुलाच उद्घाटन केलं त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार. आमची अशी अपेक्षा होती की लवकर लवकर पुलाचं काम पूर्ण करावं. पण यांनी अर्धवट काम करून उद्घाटन केलं. कदाचित विरोधकांना वाटले असेल की पुलाचं काम पूर्ण झाल्यावर आम्ही उद्घाटन करू या भीतीपोटी त्यांनी उद्घाटन केल्याचं दिसत आहे. पण काही झालं तरी लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचा अधिकार यांना कोणी दिला. ज्या कामातून लोकांना त्रास होत असेल अशा विकासाचा विकास कामाचा उपयोग काय ? असं काम ज्या ठेकेदारानं केलं आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. या कामांमध्ये लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आमचं आजही म्हणणं आहे की हा बाईकस्वारसाठी हा फुल बंद करावा.मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी या पुलावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेचे फटकारे मारले होते. त्यांनी सत्ताधारी शिवसेनेला लक्ष करीत पुलाची पहाणी केल्यानंतर सांगितले की, पलावा पुलाच उद्घाटन झाले त्यावर अचानक पडलेले खड्डे आमच्या निदर्शनास आले. पण ज्यावेळी आम्ही पुलावर निदर्शन केले त्यावेळी आमच्या निदर्शनास आले होते की या पुलाचं काम निष्कृष्ट दर्जाचं झालं आहे. त्यानुसार प्रशासनाला पत्रही दिलं होतं कि व्हिजेटीआय मार्फत गुणवत्ता तपासणी करून पूल सुरू करा. पण घाईघाईत चालू का केला ते आम्हाला माहित नाही. काम व्यवस्थित झालं असतं तर या पुलाच आम्हीच उद्घाटन केलं असतं. पण यांनी लोकांच्या जीवाची काळजी न घेता पूल चालू केला.आता झाडू मारून डागडुजी करून पुन्हा पूल सुरू केला आहे. याला जो दुसरा समांतर पूल आहे त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत त्याच काय ? ज्यांनी आपल्या जागा दिल्या त्यांच्या मोबदल्याचं काय? सगळं गोंधळाचं काम सुरू आहे.विरोधकांकडून पलावा उड्डाणपुलाच्या टिकेबाबत उत्तर देताना कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे म्हणाले, चार जुलैला पलावा येथील पूल शिवसेनेच्या माध्यमातून लोकांसाठी खुला करण्यात आला. पूल सुरू झाल्यानंतर काही मोटरसायकल स्लिप झाली. त्यामुळे मी आणि आमचे पदाधिकारी मिळून तो रस्ता बंद केला. डांबर असल्यामुळे गाड्या स्लिप होत होत्या. त्यामुळे त्या डांबरावर स्टोनक्रेशरचा थर टाकला. त्या मागचा उद्देश होता की जे ऑइल आहे ते अशा पद्धतीने निघून जाईल आणि लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यानंतर साडेसहाला पूल चालू करण्यात आला. पण स्टोनक्रेशरमुळे काही ठिकाणी खड्डे पडल्यासारखे दिसायला लागले. विरोधकांनी त्याचे फोटो काढले पण ते सर्व काही खरं नाही. कारणवाहनांचा प्रवास सुरक्षित चालू होता. आजही मी स्वतः पहाणी केली झालेले काम अतिशय चांगल्या प्रकारे आहे. पुलावर कोणत्याही प्रकारचा खड्डा नाही. विरोधकांनी केवळ चर्चा सुरू केली. मागील चार तारखेपासून आजपर्यंत इथे वाहतूक कोंडी नाही. पुलामुळे लोकांना आता मोकळा रस्ता मिळाला आहे. आमचं महायुतीचे सरकार आहे, लोकांना चांगलं काम देणार सरकार आहे. आम्ही फक्त विकासाच्या कामानीच विरोधकांना उत्तर देणार. आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आमचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब विकासाच्या नावानेच उत्तर देणार असे नेहमी सांगत असतात. कोण काय बोलतो याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही लोकांची काम करणारे आम्ही आहोत.कल्याण शीळ रोडवरील पलावा उड्डाणपूल राजकीय टीका-टीका टिपणीने जरी प्रकाशझोतात आला असला तरी तेथील वाहतूक कोंडीत सुधारणा दिसत आहे. कामावरून कल्याण डोंबिवलीत येणाऱ्या लोकांसाठी ही बाब चांगली झाली असल्याचे प्रवासी सांगत आहेत. मात्र येथील समांतर दुसरा पूलही लवकर सुरू व्हावा अशी मागणी लोक करीत आहेत. काही चौकात अद्याप वाहतूक कोंडीमुळे त्रास होत आहे त्यासाठी राजकीय लोकांनी एकत्रित प्रयत्न करा असे डोंबिवलीकर सांगतात.