( भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे वक्तव्य )
डोंबिवली : केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीच्या तयारीला लागा कारण भाजपाचा महापौर महापालिकेत बसला पाहिजे असे स्पष्ट मत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. कल्याणातील दिग्गज सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांच्यासह अनेकांनी भाजपात पक्षप्रवेश केला त्या भव्य सोहळ्यात चव्हाण बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार सुलभा गायकवाड, प्रदेश महिला आघाडी सचिव प्रिया शर्मा, जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी शहराध्यक्ष वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, मंडल अध्यक्ष रितेश फडके, स्वप्निल काठे, अमित धाक्रस यांच्यासह व्यापारी संघटना, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचा झंजावात सुरू आहे. अनेक पक्षांतील पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. कल्याणचा हा संपूर्ण परिसर आपल्याला भाजपमय करायचा असून त्यासाठी आपण सर्वांनी संघटनात्मकदृष्ट्या एकत्रित काम केले पाहिजे.
कल्याण मध्ये सामाजिक आणि राजकीय वर्तुळात जतिन प्रजापती हे सर्वश्रुत असून गेल्या दोन दशकांपासून त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख दाखवली आहे. प्रजापती यांनी 2010 आणि 2015 मध्ये स्वबळावर अपक्ष म्हणून कडोंमपा निवडणूक लढवली. पण त्यांना तेव्हा थोड्याच मतांनी हार झाली होती. तरीही खचून न जाता त्यांनी अस्तित्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले. त्यांचे सामाजिक काम, पाठीशी तरुणांची साथ आहे पाहून रवींद्र चव्हाण यांच्यामुळे जतिन प्रजापती यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला अशी चर्चा कल्याणमध्ये होती.