उद्योग करताना आर्थिक व्यवस्थापन सुयोग्य रित्या केले तर उद्योगात भरारी मिळते !

डोंबिवली : आर्थिक शिस्त म्हणजे मार्केटींग करताना आपल्या पैशाची पण काळजी घ्यावी. आपल्याकडे विक्रीतून आलेला पैसा म्हणजे उत्पन्न, तो नफा नाही. त्यामुळे ते पैसे लगेचच खर्च करु नयेत. त्या पैशातून खर्च नीट वजा करून उरलेले पैसे म्हणजे आपला नफा हे लक्षात घ्यावे आर्थिक व्यवस्थापन सुयोग्य रित्या केले तर आपण निश्चितच उद्योग भरारी घ्याल असे वक्तव्य सनदी लेखापाल जयश्री कर्वे यांनी महिला उद्योजिकांना मार्गदर्शन करताना केले.

२०१७ पासून तब्बल आठ वर्षे उद्योग भरारीच्या सीमंतिनी बिवलकर, अर्चना जोशी, अंजली साधले व सुलभा जोशी या चार मैत्रीणी महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे व आर्थिक स्वावलंबन व्हावे म्हणून वर्षातून तीन वेळा सातत्याने प्रदर्शनाचे आयोजन करीत असतात.

या पार्श्वभूमीवर रक्षाबंधन व गणेश उत्सव स्पेशल प्रदर्शन व विक्रीचे आयोजन २ व ३ ऑगस्ट २०२५ सर्वेश सभागृहात करण्यात आले होते. या प्रदर्शनात तब्बल ३८ स्टाॅल महिला उद्योजिकांचे होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन सनदी लेखापाल जयश्री कर्वे यांच्या हस्ते झाले.


यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर जयश्री कर्वे, मीना गोडखिंडी व उद्योग भरारीच्या संचालिका उपस्थित होत्या. यावेळी सीमंतिनी बिवलकर यांनी सर्वांचे स्वागत केले. तर मीना गोडखिंडी यांनी महिला उद्योजिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पुढे जयश्री कर्वे महिला उद्योजिकांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, आपला स्टाॅल आगळ्यावेगळ्या पद्धतीने आकर्षक पद्धतीने सजवला पाहिजे. म्हणजेच स्टाॅल व्यवस्थापन नेटकेपणाने करावे. प्रत्येक गिऱ्हाईकाचे हसतमुखाने स्वागत करून आपल्या उत्पादनाची माहिती व वैशिष्ट्य सांगावे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलभा जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन सीमंतिनी बिवलकर यांनी केले.