टिळकनगर गणेशोत्सव मंडळ गणेश सजावटीतून देणार “हरित डोंबिवली”चा संदेश

टिळकनगर गणेशोत्सव मंडळ गणेश सजावटीतून देणार “हरित डोंबिवली”चा संदेश

डोंबिवली, दि. १९ (प्रतिनिधी) : गेली ६८ वर्षे सजावटीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या वर्षी “हरित डोंबिबली” ही संकल्पना गणेश सजावटीतून साकार करण्याचे निश्चित केले आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडे यांच्या संकल्पनेतून “उद्यानातील गणपती” अशी निसर्ग-नयनरम्य आरास पहायला डोंबिबलीकरांना मिळणार आहे.

याबाबत डोंबिवलीकर असलेले कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी सांगितले की, लहानपणी जरी डोंबिवलीत एकच बाग होती तरी डोंबिवलीत रस्त्याच्याकडेला तसेच प्रत्येक वाड्यात मोठे वृक्ष होते. त्यावेळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत होता. पण आता डोंबिवली स्मार्ट सीटीच्या वाटचालीकडे जात असल्याने असे दृश्य पाहायला मिळेल असे आज तरी वाटत नाही. डोंबिबलीतील नैसर्गिक देणगी कमी-कमी होत जातं आहे.  यामुळेच अशा प्रकारच्या सजावटीतून मी डोंबिवलीकरांना व संस्थांना उद्यानांचे संवर्धन करा असे आवाहन करण्याचे धाडस करीत आहे.

अशा या हरित संकल्पनेची मुहूर्तमेढ म्हणून मंडळाने रोटरी क्लब डोंबिवली पश्चिम येथील चिऊ पार्कमधील  “चिमणी बचाव” या बोधचिन्हाचा परिसर सुशोभित करण्यासाठी १२०० झाडे रोटरी क्लबचे अध्यक्ष दिपक काळे आणि पार्क समितीचे सदस्य डॉ प्रल्हाद देशपांडे, माळी नितीन सावंत यांच्याकडे सुपूर्द केली. यामध्ये मिनी तगर  ६००, रिबन ग्रास १५०, एक्झोरा १५०, ल्यानटेंना  १५० आणि रोहिओ १५० अशा झाडांचा समावेश आहे.

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नंदन दातार, कार्यवाह केदार पाध्ये हे रोटरी क्लबला या सुशोभीकरणात मार्गदर्शन करणार आहेत. टिळकनगर गणेशोत्सव मंडळ अशा या “हरित डोंबिबली” सजावटीतून डोंबिवलीकरांना आणि संस्थांना चिऊ पार्क सारखी उद्याने बनवण्यासाठी प्रेरित करण्याच्या प्रयत्न करणार आहोत.